डॉ. विजया वाड
जगन्नाथ बाजारात गेला. फुलबाज्या शंभर रुपये, लवंगी शंभर, एक बाँब शंभर! उडीद डाळ, चणा डाळ शंभर शंभर. ‘शंभरी’ने डोके फिरले.
२ हजार रुपये बोनस होता खिशात. पोरीसाठी फ्रॉक अन् चार जिन्नस! खल्लास. पैसे संपले. गृहलक्ष्मीसाठी फक्त काचेची काकणं नि एक गजरा. तो सुद्धा वीस रुपये! जगूच्या पोटात खड्डा पडला. स्वत:साठी हात रुमाल घ्यायला पण पैसे उरले नाहीत.
“काय आणलं बाबा.”
“महाग आहेत वस्तू.” त्यानं उतरत्या आवाजात म्हटलं.
“हरकत नाही. मी जिद करीतच नाही.” मुली किती शहाण्या नि समजूतदार असतात ना! बापाची काळजी करतात. अंतरी प्रेम देतात. जगनने पोरीला फ्रॉक दिला. फुलबाज्या दिल्या. फटाक्यांची एक लड दिली. खूशम् खूश पोरगी! जणू बापाने जगभराचा आनंद दिला होता फ्रॉकाच्या घेरात.
गृहलक्ष्मीने प्रेमाने बांगड्या भरल्या. नवी साडी नेसली होती.
“ही दादाची लग्नभेट बरं.” तिनं आनंदानं सांगितलं. नथ घातली होती. सुरेख, नाकेली दिसत होती.
“छान दिसतेस.” तो म्हणाला.
“चला काही तरीच.” ती लाजली.
“बाबा, मी कशी दिसते? या नव्या नव्या फ्रॉकात?”
“सिंड्रेला दिसतीस.”
“मग राजपुत्र येईल मला घ्यायला. गोष्टीतल्या सिंड्रेलाला. नक्की येईल बघ आणि तुझा हात मागेल.”
“पण मी सोळाची आहे. दोन वर्षं थांबा म्हणावं!”
“अठराची लग्न? नाय नाय बाबू! पंचवीस वर्षांपर्यंत नो एंट्री ऑफ जावयबापू. हं? पक्का! ठऱ्या! ” तो मांडीवर थाप देत म्हणाला.
“प्रदीप निफाडकर ‘माझी मुलगी’ ही सुंदर कविता लिहून गेलेत.”
“हो हो. वाचलीय मी ती. “तिला पाहण्या उशिरा ये तू” असं लिहितात ते.
“काही कविता अमर असतात हेच खरं.” लेक मध्ये पडली मग.
“ते जाऊ दे बाबा. तुमच्यासाठी काय आणलंत?”
“लेडीज हातरुमाल. उतनाही बजेटमें बैठा.”
“मस्तच. मल्टीपर्पज यूज. तुम्ही, मी, आई तिघं वापरू शकतो.”
“काही. नको काही. त्यांच्यासाठी मी स्पेशल काहीतरी आणलंय.” आईनं शर्ट काढला खणातला.
“अरे वा!”
निळा शर्ट खूप आवडीचा! आभाळनिळा. अगदी आकाश खाली उतरावे तसा!
“चला, तू साडी नेस. मी शर्ट घालतो. आपली पोर फ्रॉक घालेल.”
“दिवाळी भेट. रस्त्यात मिरवू.” पोरगी आनंदे म्हणाली.
“हो मिरवूच.” आईने दुजोरा दिला. तिघं नटून थटून बाहेर पडली.
मैत्रिणी भेटल्या. आईने हसून म्हटले. “ह्यांनी नवी कापडं आणली. म्हटलं, चला मिरवून येऊ.”
“साडी साधीशी आहे.” मैत्रिणींनी म्हटलं.
“पण नव्वी कोरी तर आहे.” तिने नाक उडविले.
“फ्रॉक बरा आहे.” मैत्रिणींनी तूप लावलं.
“थँक्यू हं!” कौतुकाची परतफेड केली. जराशानं फिरता फिरता ती म्हणाली, “चला भेळपुरी खाऊ. पाणी पुरीचा चटका देऊ. बजेटमध्ये बसेल अशी मजा.”
“पैसे?” तो उदास!
“मी घेतलेत. रांजणातले.”
“मग खाऊया.” त्याने उत्साहाने म्हटले.
मिशावालं बालक! तिला हसू फुटलं.
“का गं? का हसलीस?”
“छोटीसी बात! आपण तिघं बरोबर आहोत. मजा करतोय. तुमचे मालक परदेशात आहेत. बाबू हॉस्टेलवर आहे. मालकीणबाई एकट्याच घरात. ही दीपवाळी, घरमे अकेली, नाही तोंडावरी हसू आता; सगळ्या वरवरच्या बाता.”
तो बायकोकडे बघत राहिला. “अहो, छोटी छोटी बातो में बहुत आनंद होता है! तुमच्या मित्रांच्या बायकांना आनंद शोधा म्हणावं. छोट्या गोष्टीत मोठा आनंद.” तो बायकोकडे बघतच राहिला.