पुणे : पुण्यातील गारवा बिर्याणीच्या मॅनेजरवर काही अज्ञातांनी डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली आहे. काम संपल्यानंतर दुचाकीवर घरी जात असताना मॅनेजरवर अज्ञातांनी डोक्यात वार करुन त्यांचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. भरत भगवान कदम (वय २४, रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
भरत कदम हे शनिवारी रात्री काम संपल्यानंतर दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावरील निर्मिती असोसिएटस बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या रिकामे प्लॉट येथे हल्लेखोरांनी भरत कदम यांना अडविले. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात वार केले. त्यात ते तेथेच जखमी अवस्थेत पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. याची माहिती धायरी मार्शल यांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळाली.
सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा भरत कदम यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. कदम यांच्या खिशातील पैसे, पाकिट व अन्य साहित्यही तसेच होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भरत कदम यांच्या खुनामागील नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत.