Friday, May 9, 2025

विशेष लेखमहत्वाची बातमी

गड-किल्ल्यांच्या ऐका हाका...

अनघा निकम-मगदूम


दिवाळीचे महत्त्वाचे सणाचे चार दिवस जरी सरले असले तरी दिवाळीचा माहोल अद्यापही आजूबाजूला आहे. मुलांच्या शाळेची सुट्टी अजूनही आहे. त्यात कोकणामध्ये विशेषतः खेडेगावामध्ये अनेक ठिकाणी छोट्या छोट्या मुलांनी आपल्या अंगणामध्ये, आपल्या परसदारामध्ये छोटे-छोटे किल्लेसुद्धा उभे केले आहेत. ज्याला जसं जमेल तसं दगड आणून, माती आणून त्याचा चिखल करून असे छोटे-मोठे किल्ले आजूबाजूला तयार झालेत, तर इथल्या छोट्या शहरांमध्ये त्याचा इव्हेंट तयार झाला असून, छोट्या-मोठ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती आता हळूहळू दिसायला लागल्यात. महानगरांमध्ये असे मुलांनी बनवलेले किल्ले पाहायला मिळणे तसे दुर्मीळच! पण हा नवनिर्मितीचा, आपलाच इतिहास पुन्हा उभा करण्याचा आनंद या गावांमध्ये नक्की मिळतो.


खरंच महाराष्ट्रातील हे गड-किल्ले या महाराष्ट्राचं एक खूप मोठं वैभव आहे. खूप मोठी परंपरा आहे. स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला दिलेली ही खूप मोठी ठेव आहे. आजही या गडकिल्ल्यांकडे पाहिलं तरी महाराजांनी जो स्वराज्याचा हुंकार दिला होता त्यातून त्यांनी आपलं, रयतेचं राज्य उभं केलं होतं. स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वराज्य म्हणजे काय याची जाणीव प्रत्येक मराठी माणसाला झाली ती महाराजांमुळे. बादशाही राजवटीत सुस्त झालेली मराठी माणसांची अस्मिता महाराजांनीच जागी केली. त्याचं स्वराज्याचे साक्षीदार असलेले तेच हे गडकिल्ले आजही दिमाखात उभे आहेत. आज महाराजांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देणारे हे गडकिल्ले साडेतीनशे वर्षानंतरसुद्धा आपल्यासमोर उभे आहेत आणि आपलं कर्तव्य काय आहे याची जाणीव हे सतत आपल्याला करून देत आहेत. पण खरंच याकडे एक पर्यटन स्थळ या पलीकडे आपण पाहतो का? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.


हा प्रश्न आज पडतो कारण, आज या गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अनेक गडकिल्ले, दुर्ग कोसळू लागलेत. त्यांच्यावर काळाचे परिणाम दिसू लागलेत. अर्थात हे होणारच होतं. पण एकीकडे काळाने आपलं काम सुरू केलं असलं तरीही त्यावर मात करणार तंत्रज्ञान विकसित झालं आहे. आज हे गडकिल्ले जतन करता येऊ शकतात, शिल्लक आहे ते सांभाळून ठेवता येऊ शकेल इतकं काम आता मानवानं विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करून ठेवले. त्यामुळे हे शिवकालीन किंवा त्याही पूर्वीचे असलेले गडकिल्ले आपण जतन करू शकतो. मात्र त्याकडे त्या दृष्टीने बघणंही गरजेचे आहे.


पण प्रत्यक्षात मात्र तसं होताना दिसत नाही. आपण अनेक गोष्टींवर बोलत असतो. आता कशावरही काहीही बोलण्यासाठी आपल्याकडे सध्या सोशल मीडिया हे मोठं प्लॅटफॉर्म आहे. तावातावाने एखादा विषय घेऊन तो मांडला जातो. कोण बरोबर, कोण चूक, काय योग्य, काय अयोग्य हे सांगण्यासाठी अनेक ‘विचारवंत’ या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतात. पण या सोशल मीडियाच्या आभासी जगतातून बाहेर पडून आजूबाजूला नजर वर करून पाहिले पाहिजे, तरच अशा अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्याही पलीकडे जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आपल्याला दिसतील.


इतिहासाकडे मागे वळून पहिले तरी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारे गडकिल्ले नव्या रूपाने आपल्याला दिसू लागतील. हे दुर्ग, गढी, गडकिल्ले म्हणजे पर्यटनाचे स्थळ किंवा टाइमपास करण्यासाठीची जागा नाहीये, तर आपल्या जगण्याचा श्वास आहे याची जाणीव आपल्याला तेव्हाच नक्की होईल. आणि तेव्हाच या इतिहासाचे किती जरुरीने जतन करण्याची आता गरज निर्माण झाली आहे, याचीही मनापासून जाणीव होईल.


गडकिल्ले हा आपला वारसा. वारसा म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जाणारी गोष्ट! आपला जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीकडे तितक्याच गांभीर्याने पोहोचवला पाहिजे, त्यांना तो सांगितला पाहिजे, आजवर राहिलेल्या त्याच्या खाणाखुणा तरुण वर्गाला दाखविल्या पाहिजेत आणि ही जबाबदारी त्यांच्या पालकांची, शिक्षकांची आहे. या इतिहासाची ओळख आजच्या पिढीला झाली पाहिजे. ज्या किल्ल्याच्या दगडांवर प्रेमाचे अश्लील शब्द लिहिले जातातम त्या दगडांनी अनेक घाव आजवर झेलले आहेत. किल्ल्यावर उगवलेल्या झाडीचा अडोसा घेऊन जिथे आक्षेपार्ह गोष्टी केल्या जातात, तिथे अनेक वर्षांपूर्वी शत्रूला गारद करण्यासाठी खलबतं रंगली असतील, कुठल्या गरीबाचा सन्मान केला गेला असेल, कुणा बाई-बापडीला मानाची साडी चोळी दिली गेली असेल, याची जाणीव झाली पाहिजे.


दिवाळीची सुट्टी मोठी सुट्टी. याचा अर्थ लाखो रुपये खर्चून देश-परदेशात नुसतं पर्यटन करणे, खाणे-पिणे, मौज करणे नव्हे, तर याच दिवाळीतील एक दिवस आपल्या मुलांना घेऊन एखाद्या किल्ल्याला भेट देणे होय. त्या किल्ल्याचा इतिहास स्वतः जाणून तो मुलांना सांगण्याची हीच वेळ योग्य आहे. या दिवाळीमध्ये पाडवा, भाऊबीजेसोबतच महाराजांचे स्मरण करत गडकिल्ल्यांना भेट देणे हेसुद्धा सण म्हणून, परंपरा म्हणून जपले गेले पाहिजे. आजही हे गडकिल्ले इतिहासाची साक्ष देत आपल्याला साद घालत आहेत. त्यांच्या हाका ऐकल्या पाहिजेत.


परदेशातल्या लॉन्ग टूर्सवर लाखो रुपये घालण्यापेक्षा या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पैशांचं प्लॅनिंग करणं आपलं कर्तव्य झालं पाहिजे. असं केलं तरंच आपला इतिहास जपला जाणार आहे आणि इतिहास हा नेहमीच भविष्याला मार्गदर्शक असतो आपल्या वर्तमानामध्ये सुद्धा हा इतिहास आपल्याला घडवत असतो, हा इतिहास जर जाणून घेतला, त्यातही तो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर आपण जाणून घेतला, तर आज वर्तमानात जगतानासुद्धा महाराज आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील. केवळ एखादा पिक्चर येऊन, एखादी सीरिअल येऊन छत्रपती शिवाजी महाराज नव्या पिढीला समजतील असं नाही, तर हा इतिहास सतत उजाळणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच हे गडकिल्ले जतन करून ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. ती जबाबदारी पार पडण्याची संधी या दिवाळीमध्ये आपल्याला मिळाली आहे, त्याचा अशा पद्धतीने सदुपयोग करण्यासाठी फक्त मानसिकतेचीच गरज आहे.

Comments
Add Comment