अनुराधा दीक्षित
परवाच ऐन दिवाळीत एका नातेवाइकांचा फोन आला आणि कळलं की मायाची नात गेली. वाचून फारच धक्का बसला. कारण शर्वीला मी ती बाळ असल्यापासून पाहिलं होतं. नंतर तीन-चार वर्षांपूर्वी ती शाळकरी वयात पाहिली. खूप गोड, समजदार आणि हुशार मुलगी. मेरिटमध्ये येणारी. आई आणि आजीची लाडकी. सगळं आयुष्य तिच्याभोवतीच फिरत होतं त्यांचं. तीच त्यांचा विरंगुळा होती. शर्वीची आई गीता तिला फार जपायची, तशीच मायाची तर ती दुधावरची साय होती. दोघीजणी एवढे काबाडकष्ट करीत होत्या त्या केवळ शर्वीला चांगलं जीवन जगायला मिळावं म्हणून. आपल्या दोघींसारखं खडतर आयुष्य तिच्या वाट्याला येऊ नये म्हणून! पण विधिलिखित वेगळंच होतं. हातातोंडाशी आलेली तरुण अठरा-एकोणीस वर्षांची, बारावीत शिकणारी शर्वी टी.बी.सारख्या रोगाने अचानक जग सोडून गेली. दोघीजणी धाय मोकलून रडत होत्या. पण आता काहीच उपयोग नव्हता. दोघींना जबरदस्त धक्का बसला होता.
काय पण नशीब असतं एकेकाचं! मायाला सासर मिळालं तेही खाष्ट. नवरा तर सरंजामी वृत्तीचा. मायाची खूप चिडचिड व्हायची, पण सांगणार कुणाला? ती मुंबईत, भाऊ पुण्यात रहात होता. लग्न जरी आई-वडिलांच्या संमतीने झालं असलं, तरी सगळ्यांचे स्वभाव माहिती नव्हते. नवरा कमावता आहे, पगार बरा आहे. स्वत:ची जागा, चार माणसातलं स्थळ आहे एवढं पाहून तिचं लग्न झालं. नंतर काही वर्षातच आई-वडील पाठोपाठ निवर्तले. आता आधार फक्त भावाचाच. तो सुस्वभावी होता. आई-वडिलांच्या पश्चात त्याने आपल्या तिन्ही बहिणींकडे चांगले संबंध ठेवले होते. वेळप्रसंगी कसलीही मदत बहिणींना करायला तयार होता. पण माया सोडून बाकीच्या दोघींची सासरं चांगली निघाली. मायाच्या वाट्याला काही वेगळंच लिहीलं होतं. माया मात्र हसतमुखाने राहायची. आपली परिस्थिती कोणाला कळू द्यायची नाही. तिच्या याच मऊपणाचा फायदा सासरची लोक घेत आणि एखाद्या नोकराणीसारखं तिला वागवत.
तिला दोन मुली पाठोपाठ दोन वर्षांच्या अंतराने झाल्या. गीता आणि नीता. त्यातली गीता शांत प्रवृत्तीची, आईला मदत करणारी, तर नीता तिच्या अगदी विरुद्ध. बडबडी, ओव्हरस्मार्ट. शाळेत यथातथाच लक्ष. कशीबशी एसेस्सी झाली. जवळच्याच सोसयटीतल्या एका हिरोबरोबर तिचं सूत जुळलं. नंतर कॉलेजऐवजी ब्युटिशियनचा कोर्स केला. एक दिवस त्याच्याशीच पळून जाऊन लग्न केलं. ती मजेत जगतेय.
तोपर्यंत गीताचं लग्नही बाबांनी ठरवलं. नात्यातल्याच एका मुलाबरोबर. मुंबईतच कोणत्या तरी कंपनीत क्लार्क म्हणून काम करत होता. आई-वडिलांचा एकुलता एक. गीताचं लग्नानंतर एक वर्ष छान गेलं. तिला एका फर्ममध्ये जॉब मिळाला. सात-आठ हजार मिळू लागले. त्यामुळे थोडी स्वयंपूर्ण झाली. नंतर मात्र तिचा नवरा योगेशने एकेक रंग दाखवायला सुरुवात केली. बाबांकडे काही तरी कारणं सांगून पैसे मागायचा. तेही लाडक्या पोराला नाही म्हणत नसत. मग काय त्याचं फावायचंच. मित्रांबरोबर पार्ट्या, दारू वगैरे सुरू झालं. गीताला हे बघवत नव्हतं. ती त्याला समजावून सांगून बघत असे, पण त्यांच्या डोक्यात काही शिरत नसे. तिला तो हिडीसफिडीस करायचा. आता तर तिच्यावर हात उचलण्यापर्यंत त्याची मजल गेली. एवढंच नाही, तर तिच्या पगाराच्या दिवशी तिच्या ऑफिसमध्ये जाऊन पैसे मागू लागला. ब्लॅकमेल करू लागला. ती बिचारी थोडे थोडे पैसे सेव्ह करून बँकेत टाकत होती. पण आता तो केव्हाही येऊन सावकारासारखा पैशांसाठी तगादा लावायचा. तिला स्वतःचा खर्च भागवून थोडे बाजूला काढून ठेवायला पैसेच उरेनासे झाले. तिला योगेशचं वागणं असह्य होऊ लागलं. त्यात भरीत भर म्हणजे तिला दिवस गेले. घरचं सगळं आवरून कामावर जाताना तिची दमछाक होऊ लागली. तिने आपल्या आईला सगळी परिस्थिती सांगितली. मायाने गोड बोलून सासू-सासऱ्यांना समजावून तिला काही दिवस विश्रांतीसाठी माहेरी आणलं. आतापर्यंत मुलींच्या बाबतीत बेफिकीर असलेले मोहनराव गीताची परिस्थिती पाहून थोडे विरघळले. त्यांनीही तिला माहेरी विश्रांतीसाठी राहण्याला संमती दिली. शेवटी पोटच्या पोरीबद्दल बापाला कणव वाटली म्हणायची!
थोडे दिवस बरे गेले गीताचे. तिचे डोहाळे माया पुरवायचा प्रयत्न करीत होती. पण योगेश आता तिथे येऊन गीताला पैशांसाठी त्रास देऊ लागला. आई-वडिलांना त्रास नको, म्हणून गीता गुपचूप घरी गेली त्याच्याबरोबर! यथावकाश गीताला मुलगी झाली. गीताने रजा घेतली होती. छोट्या शर्वीचं करण्यात तिचा वेळ जायचा. नाईलाजाने तिला शर्वीला पाळणाघरात सोडून कामावर जायला लागायचं. खरंतर सासुबाईंची तब्येत ठणठणीत असूनही त्या नातीला सांभाळायला तयार नव्हत्या. कामावरून घरी येताना गीता शर्वीला बरोबर घेऊन यायची. योगेशलाही आपल्या मुलीला जवळ घेऊन कधी खेळवावंसं वाटत नसे. दिवसेंदिवस योगेशचं बायको मुलीकडे दुर्लक्ष, सासू-सासऱ्यांचा असहकार ह्याला गीता कंटाळली. तिला नोकरी करणं अशक्य झालं. तिने नोकरी सोडून दिली. मुलीला घेऊन ती सरळ माहेरी आली. परत तिकडे न जाण्यासाठी.
माया तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. मोहनरावांना ही कायमची दोघींची जबाबदारी नको होती. तेही आता निवृत्त झाले होते. पैशांचा ओघ कमी झाला होता. म्हणूनच मायाने कंबर कसली आणि भाड्याची जागा घेऊन पोळी-भाजी सेंटर सुरू केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पहाटे चार वाजता उठून ती शंभरेक पोळ्या आणि भाजी तयार करीत असे. सेंटरवर जाऊन ऑर्डरप्रमाणे नोकरीवाल्या गिऱ्हाईकांसाठी पार्सल तयार करून देत असे. गीताही तिला या कामात हातभार लावू लागली. त्यामुळे मायाचा चांगला जम बसला.
शर्वी दिसामासाने मोठी होत होती. आपल्या बाळलीलांनी सर्वांना आनंद देत होती. हळूहळू गीताने तिला बालवाडीत घातलं. तिथे शर्वी रमू लागली. सवंगड्यांबरोबर खेळू लागली. तिथल्या ताईंनी काय काय शिकवलं, ते बोबड्या बोलीत आईला सांगू लागली. तिच्या कौतुकात आई, आजी आपला दिवसभराचा शीण विसरत. हळूहळू आजोबाही तिच्या कौतुकात सामील होऊ लागले. शर्वीने सर्वांची मने जिंकली होती.
अजून गीता-योगेशचा घटस्फोट झाला नव्हता. केसच्या तारखा पडत होत्या. पण बरेचदा योगेश हजरच राहायचा नाही. अधेमधे मायाच्या घरी येऊन गीताला मानसिक त्रास द्यायचा. एकदा कहर झाला. गीता त्याला दाद देत नाही, हे पाहून तो तिथे आला आणि त्यांच्या जागेसमोरच्या जिन्यावर येऊन गीताला अर्वाच्य बोलू लागला. मायाने त्याला कडक शब्दांत झापलं, तर त्याने हातातली दारूची बाटली अंगावर ओतून घेतली, स्वतःला पेटवून घेतलं. कपड्यांनी पेट घेतल्यामुळे तो ओरडू लागला, मोहनराव पुढे धावत जाऊन आपल्या हातांनी आग विझवायचा प्रयत्न करू लागले. मोहनरावांचे हातही भाजले होते. शेजारी-पाजारी गोळा झाले.त्यांनी त्याच्या अंगावर पाणी ओतून कशीबशी आग विझवली. पण योगेश खूप भाजला होता. पोलीस केस झाली. योगेशला इस्पितळात दाखल केलं. पण थोड्याच वेळात तो मरण पावला. ह्या सगळ्या प्रकाराने माया, गीता हबकून गेल्या. एक बरं झालं की, योगेशच्या कचाट्यातून गीताची सुटका झाली. योगेशने केलेला तमाशा सगळ्यांनी पाहिलेला असल्याने गीतावर त्याचं काही बालंट आलं नाही.
दिवसेंदिवस मोहनरावांचा स्वभाव फार हट्टीपणाकडे झुकला होता. त्यांच्या काही मनास येत नसे. मायाही आता वयोमानानुसार थकत होती. त्यांच्यामागे सतत नाचायला तिला जमत नसे. त्यामुळे दोघांचे वाद होऊ लागले. शेवटी मायाने त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली. मोहनरावांचे पेन्शनचे पैसे तिकडेच खर्च होऊ लागले. पण निदान डोक्याला थोडी शांतता मिळू लागली.
मायलेकी काबाडकष्ट करून पोळीभाजी सेंटर चालवून तिघींचं व्यवस्थित भागवत होत्या. शर्वीचा शाळेचा खर्चही भागवत होत्या. त्या दोघींची एकंदर परिस्थिती कानावर येत असल्याने मायाचा भाऊही तिला थोडी आर्थिक मदत करीत असे. बघता बघता शर्वी आता मोठी झाली. दहावीला ९५ टक्के गुण पडले. ती बारावी सायन्सला चांगले गुण मिळवून कंप्युटर इंजिनीअर बनण्याचं स्वप्न पाहत होती. त्यादृष्टीने तिचे प्रयत्न चालू होते. नेटवर विविध संस्था, कॉलेज वगैरेंची माहिती ती पाहत असे. माया, गीता तिला प्रोत्साहन देत. कौतुकाने तिचं बोलणं ऐकत.
शर्वीची बारावी चालली होती. तिचं सायन्स कॉलेज असल्याने तिला घरी यायला उशीर व्हायचा. ज्यादाचे तास असायचे. स्टडीत थांबायची. जीवापाड मेहनत करायची बिचारी! अलीकडे ह्या ताणामुळे तिची तब्येत थोडी खालावल्यासारखी दिसत होती. इकडे वृद्धाश्रमात मोहनरावांच्या तब्येतीच्याही तक्रारी चालू होत्या. माया अधेमधे तिकडे जाऊन त्यांची खबरबात घ्यायची. तिला पाहून ते अधिकच चिडचिड करायचे. आता त्यांचे आदेश पाळायला माया सतत तिथे नव्हती ना! आश्रमाच्या नियमांनुसार तिथे त्यांना जुळवून घ्यावं लागत होतं. अशातच एक दिवस अचानक मोहनराव झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने आश्रमातच गेले.
आजोबांना जाऊन पंधरा दिवस होतात न होतात तोच शर्वीचं नाजूक प्राणपाखरू एक दिवस शरीरातून उडून गेलं. अगदी दिवाळीच्या दिवशी! सारं जग आनंदाने प्रकाशोत्सव साजरा करत होतं, तेव्हा मायाच्या घरात मात्र मिट्ट काळोख पसरला होता.