सुमती पवार
दिसायला आहे काळा पण गुणी किती आहे,
साऱ्या नजरा बघती माझ्याकडे काय आहे……
काळ्यावरती पांढरे गरू किती लिहितात,
एका हातात डस्टर चटकन पुसतात… …
किती घडविल्या पिढ्या पण शाळेत मी आहे,
कुणी असो राव रंक एकटक मला पाहे…
किती अक्षरे रेखीव चित्र काढतात छान,
पिढ्या घडवितो सदा मला असे पाहा भान… …
नाही भेदभाव केला स्वच्छ असे माझे ध्येय,
माझ्यासमोर बसती चिमुकले मला प्रिय…
किती प्रेमाने खडूने लिहितात काही बाही,
त्यांना लिहू दे काहीही, चिडत मी मुळी नाही… …
रंग असो ही कोणता स्वच्छ असावे हो मन,
ज्ञानवंत गुणवंत घडविणे माझे धन…
अंग आंबले जरी हो नाही खंडित ही सेवा,
कधी कधी वाटतोच माझा मला हेवा…
मोठा कितीही असू दे घेती आधार माझाच,
इतिहास वजाबाकी नाही होतं कधी जाच…
दिले नेमून ते काम सेवा करतो आनंदाने,
नाही हिणवत कुणी नाही बोलत खेदाने……
फळा मानाचा मी मोठा नाही अभिमान गर्व,
जो जो जन्मला जगात सारे सारे मला प्रिय…
जे न स्पर्शले मला हो जाई जीवन ते वाया,
ज्ञानसूर्य तेजाळतो अशी आहे माझी काया…