रमेश तांबे
एक होतं बकरीचं पिल्लू. ते खूपच होतं अल्लड! त्याचं काम एकच उड्या मार उगाच. इकडे पळत जा, तिकडे पळत जा. हवेत गिरक्या घे कुणालाही ढुश्या दे. साऱ्या बकऱ्या आणि त्यांची पिल्ले वैतागून गेली सारी. बकरीच्या पिल्लाची चाले दादागिरी. एक दिवस त्यांची भरली सभा. बकरीच्या पिल्लाला केला पिंजऱ्यात उभा. सारे म्हणाले सुरात, डांबून ठेवा त्याला घरात! जोपर्यंत नीट वागत नाही, तोपर्यंत जेवण नाही त्याला!
निकाल ऐकून सभेचा पारा चढला पिल्लाचा. पिल्लू म्हणाले, ‘नाही नाही तुम्ही कोण मला शिक्षा करणार. मी नाही तुमच्या बरोबर राहणार.’ असे म्हणताच पिल्लाने उडी मारली जोराने. पळत सुटले जंगलाकडे. सारेच बघत बसले एकमेकांकडे. दिवसभर पळत होते पिल्लू. दमले भागले पिल्लू बसले झाडाखाली. बाजूलाच होती लांडग्यांची टोळी. तेच होते झाड जिथे लांडग्यांची पिल्ले खेळायची. रात्रीच्या वेळी तिथेच झोपायची. थोड्याच वेळात लांडग्यांची पिल्ले जमली झाडाखाली. बकरीच्या पिल्लाला बघतच बसली. क्षणभर पिल्लू घाबरले पण मोठ्या हिमतीने म्हणाले ‘काय रे लांडग्यांच्या पिल्लांनो, माझ्या प्रिय प्रिय मित्रांनो मी येऊ का आजपासून तुमच्या सोबत खेळायला!’ लांडग्याच्या पिल्लांना बकरीचं पिल्लू खूपच आवडले. त्यांनी त्याला आपल्या टोळीत घेतले. मग पिल्लू लागले खेळू, विसरून गेले हे तर आपले शत्रू!
बराच वेळ झाला. पिल्लाने खूप मजा केली. खेळताना त्याने खूप आरडाओरडा केला. पिल्लाच्या बॅ… बॅ… बॅ… आवाजाने जंगल जागे झाले. लांडगे, वाघ, कोल्हे सारे आवाजाच्या दिशेने निघाले. साऱ्यांनाच वाटले आयती शिकार मिळाली. पण पुढे काय होणार हे पिल्लाला कसे कळणार!
तेवढ्यात एक भुकेलेला लांडगा पिल्लाच्या दिशेने धावला. कान पकडून पिल्लाचा घेऊन त्याला निघाला. तसा लांडग्याच्या पोरांनी एकच आरडाओरडा केला. सारे म्हणाले, ‘आमचा आहे तो मित्र जंगलच्या राजाला दिलं आहे पत्र.’ पण लांडगा काही ऐकेना पिल्लाला काही सोडेना.
तेवढ्यात समोर उभा ठाकला जंगलचा राजा सिंह. त्याला बघताच लांडगा गेला पळून. बकरीच्या पिल्लाला मात्र काहीच कळेना. हा कोण समोर उभा त्याला काही समजेना. मग लांडग्याच्या पोरांनी सलाम केला राजाला अन् म्हणाले, ‘महाराज हा आमचा मित्र, फिरू द्या याला सर्वत्र’! सिंहाने विचारले पिल्लाला, ‘इथे कसा आलास.’ पिल्लू म्हणाले, ‘मला दिलं हाकलून मग निघून आलो गावातून. मला वाटलं जंगलात राहाता येईल मजेत. पण इथे तर प्रत्येक जण मला टपलेत खायला. मी कुठे जाऊ येतय मला रडायला.’ सिंह म्हणाला, ‘हे बघ पिल्ला इथे जंगलात आहे एक किल्ला. त्यात राहतात माणसं त्यांच्याकडेच तू जा बरं. इथं पावलापावलावर आहे मरण, कोण करणार तुझं रक्षण. म्हणून सांगतो, तू त्या किल्ल्यात जा अन् कर तिथं मजा!’ मग सिंहासोबत पिल्लू गेलं किल्ल्यापर्यंत. सिंहाला, आपल्या सर्व मित्रांना टाटा करून शिरलं आत. बघतो तर काय आत बकऱ्याच बकऱ्या. खायला होत्या हिरव्यागार पेंढ्या!
पिल्लू म्हणालं, ‘अरेच्चा माणसं बरीच आहेत की इथे! मरायची इथं नाही भीती. आपल्याच बकरी लोकांत राहू अन् खूप खूप मजा करू.’ असं म्हणून बकरीचं पिल्लू उड्या मारीत सुसाट पळालं अन् बकऱ्यांमध्ये सामील झालं!