नाशिक (वार्ताहर) : ओझर विमानतळावरून हिंदुस्तान एरोनोटीक्स लिमिटेड कंपनीची विमानसेवा दिली जाते. पंरतु आता या विमानतळाच्या धावपट्टी देखभाल व दुरुस्तीच्या कामानिमित्त २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान सलग १४ दिवस विमानसेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात कुठलीही विमानसेवा दिली जाणार नसल्याने विमान कंपन्यांसह प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
एचएएलने दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात सलग १४ दिवस विमानतळ बंद ठेवण्यात येणार असल्याने या ठिकाणाहून विमानसेवा बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये हवाई वाहतूक संचालनालयच्या निर्देशानुसार धावपट्टीची देखभाल दुरुस्ती आणि मजबुती केली जाणार आहे. त्यामुळे कुठलेही विमान धावपट्टीवर उतरू किंवा उड्डाण घेऊ शकणार नाही. दरम्यान, नाशिक विमानतळावरून २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत स्पाईस जेट या कंपनीची नवी दिल्ली आणि हैदराबाद ही सेवा देखील बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच ४ डिसेंबरपासून धावपट्टी नियमित उपलब्ध राहणार आहे.
नैसर्गिक वातावरणाच्या परिणामामुळे शिर्डी विमानतळ हे विमान वाहतुकीसाठी अडचणीचे ठरते. बऱ्याच वेळा विमान उतरवणे अथवा टेक ऑफ करणे शक्य होत नसल्याने विमानसेवा इतर विमानतळावर वळविली जाते. त्यामुळे शिर्डी तिरुपती विमानसेवा नाशिक विमानतळावरून वळविण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता पुन्हा सोमवारी (दि. ३१) ऑक्टोबर रोजी स्पाईस जेट कंपनीच्या वतीने चेन्नई ते शिर्डी विमानसेवा तांत्रिक कारणास्तव शिर्डी विमानतळावर चेन्नईचे येणारे विमान नाशिक विमानतळावर उतरणार आहे.