मुंबई (प्रतिनिधी) : राणीच्या बागेत दिवाळीच्या सुट्टीत लाखो लोकांनी या ठिकाणचे प्राणी आणि पक्षी पाहण्यासाठीची गर्दी केली. याठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे तसेच प्राण्यांच्या आणि पक्षांच्या संख्येतील वाढीव संख्येमुळे याठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत आहे. पर्यटकांसाठी लवकरच मगर, सुसरी राणीबागेत आणले जाणार आहेत. या मगर सुसरी ओडिसा, चेन्नई येथून आणल्या जाणार आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी मगर सुसरीच्या अनुभवासाठीच ‘व्ह्युविंग गॅलरी’ बनवली जात आहे. मुंबई महापालिका यासाठी २० कोटी रुपये खर्च करणार आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. प्राणी संग्रहालयाचा सध्या कायापालट करण्यात येत आहे. या ठिकाणी वाघ, हरीण, तरस, अस्वल, हत्ती, अजगर आणि शेकडो प्रकारचे पक्षी, झाडे आहेत. तसेच पाच मगरी आणि दोन सुसरीदेखील आहेत. या मगरी पाहण्यासाठी पर्यटक खिळून राहतात. त्यामुळे आगामी काळात मगरी सुसरींची संख्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी नंदनकाकन, ओडिसा आणि क्रोकोडाइल बँक मद्रासकडे पालिकेने पाठपुरावा सुरु केला असल्याचे सांगण्यात आले.
प्राणी संग्रहालयात वाघांसाठी तयार केलेल्या काचेच्या ‘व्ह्युविंग गॅलरी’ प्रमाणे दर्शनी भाग बनवण्यात येणार आहे. मगरीसाठी १५०० स्क्वेअर मीटर जागा अंदाजित करून ही गॅलरी बनवण्यात येणार आहे. यामध्ये जाऊन ‘अंडर वॉटर’ आणि ‘डेक व्ह्युविंग’ पद्धतीने मगरी, सुसरी पाहता येणार आहेत. सध्या या ठिकाणी असणा-या मगरी, सुसरींना विविध प्रकारचे मासे, बफेलो बिफ, चिकन असे खाद्य देण्यात येत आहे.