मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे प्रथमच आपल्या इतिहासातील सर्वाधिक पूजा, दिवाळी आणि छठ सण विशेष गाड्या यावर्षी प्रवाशांच्या सुविधेसाठी चालवल्या आहेत. सणाच्या गर्दीला तोंड देण्यासाठी मध्य रेल्वे २५८ विशेष गाड्या चालविल्या आहेत. या २५८ पूजा, दिवाळी आणि छठ सण विशेष गाड्या मध्य रेल्वेने आतापर्यंत चालवल्या गेलेल्या सर्वात जास्त आहेत. नोव्हेंबर २०२२ अखेरपर्यंत या गाड्या धावणार आहेत.
नियमित गाड्यांव्यतिरिक्त, मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पूजा, दिवाळी आणि छठ पूजेसाठी २५८ विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. यामध्ये जयनगर आणि मुंबई, नांदेड आणि पुणे तसेच छपरा आणि पनवेल दरम्यान इतर रेल्वेने चालवल्या जाणाऱ्या १६ फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन्स वगळल्या आहेत. मध्य रेल्वेने गोरखपूर, वाराणसी, मालदा शहर, बलिया, दानापूर, पाटलीपुत्र, मडगाव, नागपूर इत्यादी विविध स्थळांसाठी फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनची योजना आखली आहे. या २५८ विशेष गाड्यांपैकी, १०३ गाड्या आधीच प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्यासाठी चालल्या आहेत आणि उर्वरित १५५ या नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत असतील. यामध्ये १४ फेस्टिव्हल स्पेशल पूर्णपणे अनारक्षित आहेत.
मध्य रेल्वेने स्थानकांवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी चोवीस तास सुरक्षा कर्मचारी तैनात करून प्रवाशांना ट्रेनमध्ये आरामात चढता यावे यासाठी मदत केली. गर्दीच्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी आणि हेल्प डेस्कद्वारे प्रवाशांना माहिती देण्यासाठी अतिरिक्त अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने फेस्टिव्हल ट्रेनच्या धावण्याच्या तपशीलाची संपूर्ण माहिती प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर प्रसारित केली आहे. या सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी विनाकारण अलार्म चेन ओढू नये, ज्याचा ट्रेनच्या धावण्यावर परिणाम होत आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना वेळेत स्थानकावर येण्याचे आवाहन केले आहे की जेणेकरुन प्रवाशांना ट्रेनमध्ये चढणे सोपे होईल.