Friday, April 25, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखराजनाथ सिंग यांचा पाकला इशारा

राजनाथ सिंग यांचा पाकला इशारा

कोणत्याही देशाची प्रगती व्हायची असेल, तर देशांतर्गत आणि देशाच्या सीमा भागांत तसेच शेजारच्या देशांमध्येही शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजेच शेजारच्या देशांची वर्तणूक चांगली असेल आणि त्यांच्या मनात खोट नसेल तर त्या उपखंडात शांतता आपसूकच प्रस्थापित होईल. तसेच त्या भागांतील सर्वच देश परस्परांचा मान राखून व्यवहार करू लागले तर सर्वांचाच विकास घडून येण्यास वेळ लागणार नाही. म्हणजेच ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे सर्वच देश परस्परांच्या सहकार्याने प्रगतीची वाट धरतील. पण प्रत्यक्षात तसे घडताना बिलकुल दिसत नाही. कारण आपले काही शेजारी देश प्रामुख्याने पाकिस्तान, चीन हे तर सदोदित आपल्याशी कट्टर वैऱ्याप्रमाणेच वागताना दिसत आहेत.

आपला एक ‘सख्खा शेजारी, पण पक्का वैरी’ याप्रमाणे वागणारा पाकिस्तान नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने आपल्या कुरापती काढत असतो आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हणावा असा काश्मीर हा आपला अविभाज्य घटक असला तरी या काश्मीरवर पाकिस्तानचा नेहमीच डोळा असतो आणि तेथील परिस्थिती अस्थिर करण्याचा तेथील राजकारण्यांचा सततचा प्रयत्न सुरू असतो. किंबहुना काश्मीरच्या मुद्द्यावर पाकमधील सत्ताधाऱ्यांचे सर्व गणित अवलंबून असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या ताब्यातील काश्मीर आणि पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा काही भाग ज्याला पाकव्याप्त काश्मीर असे म्हटले जात आहे. आपल्या ताब्यातील काश्मीरमध्ये घुसखोरी घडवून तेथे घातपात घडविण्याचा सततचा प्रयत्न पाककडून केला जातो. त्यासाठी तेथील तरुणांची माथी भडकवून त्यांना दहशतवादी कृत्ये करण्यास भाग पाडले जाते. अशी पाकची कुटनिती असून पाकव्याप्त काश्मीर हाही दहशतवाद्यांचा फार मोठा अड्डा बनला होता. पण देशात २०१४ मध्ये जेव्हा सत्तापालट होऊन नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तेव्हापासून पाक पुरस्कृत दहशतवादाला मोठा आळा बसला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तेथील लोकांवर अत्याचार केले जात आहेत आणि त्यांचे धर्मांतर करणे किंवा त्यांना भारतविरोधात दहशतवादी कृत्ये करण्यास भाग पाडले जात आहे. पाककडून येथील नागरिकांच्या सर्व हक्कांचे उल्लंघन करण्यात येत आहे.

पण जेव्हापासून काश्मीरमध्ये ३७० कलम उठविण्यात आले तेव्हापासून पाकचा चांगलाच तिळपापड झाला आहे. पाकच्या कुरापतींचा धागा पकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील, असा कडक इशारा दिला आहे. दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो, भारताला लक्ष्य करणे, भारतात अस्थिरता निर्माण करणे हे त्यांचे एकमेव ध्येय असते. काश्मीरसंबंधित असलेले ३७० कलम रद्द केल्यानंतर या ठिकाणच्या लोकांबद्दल असलेला भेदभाव संपल्याचे दिसत आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द करण्यात आले होते. तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रदेश पाकिस्तानकडून भारतामध्ये परत आणल्यानंतरच भारताचे मिशन पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.

जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमध्ये अनुच्छेद ३७० हटविल्यापासून या प्रदेशांमध्ये विकासाची अनेक कामे जोमाने सुरू आहेत. पाकव्याप्त काश्मीर हा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच १९९४ सालात भारतीय संसदेने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानातून पुन्हा भारतात घेण्यासंदर्भात ठराव मंजूर केला होता. पण तो अद्याप प्रत्यक्षात उतरलेला नाही. याच संदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू – काश्मीरमध्ये शौर्यदिनाचे औचित्य साधत एक मोठे वक्तव्य केले आहे. ‘पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर लवकरच भारतात येईल, असे राजनाथ सिंह म्हणाले. जम्मू – काश्मीरमध्ये ‘शौर्य दिवस’ कार्यक्रमात राजनाथ यांनी पाकला हा इशारा दिला आहे.

भारतीय लष्कराचा सगळ्यात मोठा भाग असलेल्या पायदळाचे देशरक्षणातील योगदान गौरविण्यासाठी दरवर्षी २७ ऑक्टोबर रोजी ‘पायदळ दिवस’ साजरा केला जातो. १९४७ साली याच दिवशी भारतीय लष्करातील पायदळाचे जवान प्रथमच श्रीनगर विमानतळावर उतरले. त्यामुळे श्रीनगरच्या वेशीवर आलेले घुसखोर माघारी गेले आणि जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या पाठिंब्याने होत असलेली घुसखोरी रोखणे शक्य झाले. म्हणून देशाच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आपण जेव्हा गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचू तेव्हाच आपले लक्ष्य पूर्ण होईल, असे संरक्षणमंत्री म्हणाले. राजनाथ सिंह यांनी इतरही काही मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. भारताने जम्मू, काश्मीर आणि लडाखमध्ये ज्या प्रकारे विकासाची कामे सुरू केली आहेत, ती पाहता पाकच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. आपण विकासाच्या मुद्द्यावर भर दिला आहे, तर पाककडून सतत दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. पण आता संरक्षणमंत्र्यांनी गिलगिट, बाल्टिस्तानपर्यंत पोहोचण्याचे आणि ते ताब्यात घेण्याचे वक्तव्य केल्याने पाकचे धाबे दणाणले असणार हे निश्चित. पण त्यांच्याकडून पुन्हा आगळीक केली जाण्याची शक्यता ध्यानी घेऊन अधिक सजगता बाळगणे महत्त्वाचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -