नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषकाच्या सामन्यागणिक भारताचा स्फोटक फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहली चमकदार कामगिरी करत आहे. कोहलीची ही अप्रतिम कामगिरी पाहून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नीही त्याचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. पहिल्यांदाच ते कोहलीबद्दल बोलताना दिसले. यासोबतच बिन्नी असेही म्हणाले की, विराट कोहली अशा टप्प्यावर आहे जिथे त्याला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या जुन्या रंगात परतला आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो योग्य वेळी फॉर्ममध्ये आला आहे. टीम इंडिया देखील त्याच्या फॉर्मचा फायदा घेत आहे. पाकिस्तानविरुद्धची नाबाद ८२ धावांची खेळी असो किंवा नेदरलँडविरुद्धची नाबाद अर्धशतकी खेळी असो कोहलीची पारी अप्रतिम होती.
विराट कोहलीचे कौतुक करताना बिन्नी यांनी म्हटले, ‘ती खेळी म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न होते. कोहलीची ती अप्रतिम खेळी होती त्यामुळे भारताला विजय मिळाला. तुम्ही असे फार कमी सामने पाहिले असतील जे सुरूवातीपासून पाकिस्तानच्या बाजूने होते आणि अखेर भारत बाजी मारतो. विक्रमी संख्येने आलेल्या प्रेक्षकांना जे पाहायचे होते ते पाहायला मिळाले.’ बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे कर्नाटक येथे त्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, अखेर माजी कर्णधाराने स्वत:ला सिद्ध केले का? या प्रश्नावर बिन्नी यांनी म्हटले, विराट कोहलीला स्वत:ला सिद्ध करण्याची काहीच गरज नाही. तो एक स्टार खेळाडू असून त्याच्यासारखे खेळाडू दबावाच्या परिस्थितीत शानदार खेळी करतात. तसेच जेव्हा तुम्ही सामना हरता तेव्हा पराभव स्वीकारायला हवा आणि सामना ज्याप्रमाणे भारताने जिंकला ज्या प्रकारे खेळाडू खेळले त्याबद्दल कौतुक केले पाहिजे. असे बिन्नी यांनी नो-बॉलच्या वादावर म्हटले.
सध्या ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवून विजयी सलामी दिली होती. दुसऱ्या सामन्यात नेदरलॅंड्सचा पराभव करून भारताने उपांत्यफेरीकडे कूच केली आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ऐतिहासिक खेळी केली होती, ती खेळीचे कौतुक करताना बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्या खेळीला प्रेक्षकांना एखाद्या स्वप्नाप्रमाणे अनुभवले असल्याचे त्यांनी सांगितले. विराटने पाकिस्तानविरूद्ध ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली होती.