नंदुरबार : गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यातील विकासकामे मंदावली होती, त्याला गती देण्याचे काम युतीचे सरकार करत आहे, हे सर्वसामान्यांचे सरकार असून, लोकांच्या भावना पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत. २०१९लाच हे सरकार यायला हवे होते. आता काही जण बांधावर जातायेत त्या सर्वांना मी कामाला लावले, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे पिता-पुत्रांना टोला लगावला. शिंदे हे सध्या नंदुरबार दौऱ्यावर असून, त्यावेळी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, “गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये आपण अनेक मोठे निर्णय घेतले. त्यात शेतकऱ्याचे हिताचे निर्णय घेण्यात आले. केंद्राने ज्या प्रकारे पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या होत्या त्याच प्रकारे राज्य सरकारनेही कमी केल्या. मात्र, गेल्या अडीच वर्षांमध्ये ते निर्णय घेण्यात आले नाहीत. परंतु आमचे सरकार आल्या-आल्या पेट्रोलमध्ये ५ आणि डिझेलमध्ये ३ रुपयांची कपात केली, असे म्हणत शिंदेंनी महाविकास आघाडीवर खापर फोडले.
पुढे शिंदे म्हणाले की, “शेतकरी संकटात होते त्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले. आतापर्यंत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत दिली जात होती. मात्र, आपल्या सरकारने एनडीआरएफच्या दुप्पटीने मदत करण्याचा निर्णय घेतला. दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरचा निर्णय घेण्यात आला. नियमाने मदत जर केली असती तर १५०० कोटी रुपये लागले असते. मात्र, आम्ही ६००० कोटी रुपये वाटले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.