Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडी

गुजरात सरकार ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत

गुजरात सरकार ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात सरकार राज्यात ‘यूनिफॉर्म सिव्हिल कोड’ अर्थात समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबतची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी दिली. याचाच एक भाग म्हणून गुजरात सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.


केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी सांगितले की, राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका समितीचे गठण केले जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील. तसेच या समितीत तीन ते चार इतर सदस्य असतील.


अधिक माहिती देताना गृहमंत्री संघवी म्हणाले की, “देशभरातील नागरिकांकडून ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे गुजरात सरकारने या महत्त्वाच्या मुद्द्यावर आज निर्णय घेतला आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील अनेक नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते रूपाला यांनी सांगितले.


दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर होऊ शकते. या निवडणुकीपूर्वीच राज्य सरकार समान नागरी कायदा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. समान नागरी कायद्याच्या आनुषंगाने अभ्यास केला जाणार असल्याची माहिती गुजरातच्या गृहमंत्र्यांनी दिली.

Comments
Add Comment