Wednesday, April 30, 2025

रायगड

पनवेलमध्ये डोळ्यांची साथ

पनवेलमध्ये डोळ्यांची साथ

नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेल परिसरातील लहान मुले आणि नागरिक गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्यामुळे हैराण झाले आहेत. डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो, त्याला कॅान्जुक्टीव्ह म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊन डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. सध्या याची पनवेलमध्ये साथ आल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

पनवेलकर सध्या डोळे येण्याच्या साथीने त्रस्त आहेत. वातावरणातील आद्रतेमुळे संसर्गाच्या प्रसारास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांनी बाहेर जाणे टाळावे. डोळे आल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारामुळे आले आहेत, याचे निदान करून उपचार करायला हवेत. गेल्या आठवड्यापासून डोळ्यांची साथ पसरू लागली आहे. या प्रकारात डोळ्यांना सूज येते, अशीच काहीशी लक्षणे दिसून येत आहेत.

डोळ्यांवर घरगुती उपाय करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असे आवाहन रुग्णांना तज्ज्ञांकडून केले जात आहे. स्वतःचा टॉवेल, रुमाल व इतर साहित्य कोणालाही वापरायला देऊ नये. डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डोळे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले तर दुसऱ्याला देखील डोळे येतात. त्यामुळे डोळे आलेल्या व्यक्तीने शक्यतो घरीच थांबले पाहिजे. डोळे आलेल्या व्यक्तीने टॉवेल, ग्लास वेगळे ठेवले पाहिजेत. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधे घ्यावीत, डोळे आल्यास डोळ्यांना हात लावू नये, वेगळा रुमाल वापरावा. - डॉ. रजत जाधव - मेडिकल डायरेक्टर, हीलिंग टच आय हॉस्पिटल.

Comments
Add Comment