डॉ. मिलिंद घारपुरे
दरवर्षीसारखी एक दिवाळी पहाट. या वेळी ठरवून थोडीशी वेगळी केलेली. नको ते नेहमीचे ‘उठा उठा दिवाळी आली आणि मोती स्नानाची वेळ झाली…’ मेडिकलचे शेवटच्या वर्षाचे दिवस आठवत होते. दिवाळीला घरी न येता मित्रांसोबत रट्टा मारत बसलेलो आम्ही. तब्बल वीस वर्षे होत आली आता… मग ठरलं तर! या दिवाळीला सकाळी सकाळी त्यावेळेच्या समस्त गुरुजनांच्या भेटी गाठी… काहीतरी वेगळं नेहमीपेक्षा… सटासट सात-आठ फोन झाले. सहाला निघून नऊ वाजता पुण्यात हजर. जमलो आम्ही सहाजण. लिस्ट तयार होती, सुरुवात झाली एकेका घरापासून. अप्रतिम हृदयस्पर्शी अनुभव अपेक्षेपेक्षाही. आम्हाला समाधान देणारा आणि गुरुजनांना सुखावणारा. अजूनही शिकण्यासारखं खूप काही शिल्लक राहिले आहे, हेही दाखवणारा.
आता शेवटचे घर आमच्या खास लाडक्या सरांचं… ४, ४.३०चा सुमार… पोहोचलो… सर बेहद्द नाही, तुडुंबsssss खूश. जवळजवळ ७५ पार केलेला हा ज्ञानवृद्ध तपोवृद्ध म्हातारा अजून ताठ उभा होता. अजूनही तीच तडफ, जोश, तजेलदार अंगकांती, तेजपुंज घारे पाणीदार डोळे, गात्रागात्रात रसरसता उत्साह. अनेक नवीन प्रकल्प सरांनी उत्साहाने सांगायला सुरुवात केली. प्रथम वर्षाच्या मुलांसाठी, तृतीय वर्षांच्या मुलांसाठी चालू केलेले लिखाण. विशिष्ट रुग्णांचे अनुभव संकलन. काही वेगळ्या चिकित्सा. काही ग्रंथावर स्वतंत्रपणे लिहित असलेली टीका. आयुर्वेदातील नवं आधुनिक संशोधन. आयुर्वेदाच्या संदर्भात सरकारशी चालू केलेला पत्रव्यवहार. आश्चर्य म्हणजे या वयातही pubmed, research gate, food & nutrition त्यावरचे अनेक रिसर्च पेपरचे संकलन. स्वतःचेही एका रिसर्च पेपरचे चालू केलेले लिखाण, वेगवेगळ्या पब्लिकेशनचा अभ्यास… अतिशय थक्क करणारा आणि आम्हाला थोडा थकवणारा लाजवणारा अनुभव. उगाचच आलेला inferiority का काय म्हणतात तसा complex.
काकू आल्या. चहा, पोहे घेऊन. हक्काने प्रत्येकाची चौकशी झाली, म्हणाल्या, ‘अरे सरांना म्हणावं जरा आराम करा, शांत बसा. म्हातारे झालात आता!’ गडगडाटी हसत सर म्हणतात, ‘अगं म्हातारा काय म्हणतेस?, म्हातारी तर तू झालीयेस, मी छान तरुण आहे अजून…’ मनापासून हसलो आम्ही. खरंच की, सर कुठे म्हातारे झालेत? छान वृद्ध झाले आहेत. वृद्ध एक साधा सरळ संस्कृत शब्द. ‘वाढणे, मोठे होणे’ ज्ञानाने, वयाने, बुद्धीने अनुभवाने, अभ्यासाने, अनेक रुग्णांच्या आशीर्वादाने, ज्ञानदानाच्या तपश्चर्येने वृद्ध झाले होते सर. म्हातारपण, वार्धक्य असे सगळे शब्द फक्त शरीराला, निष्क्रियता दर्शवणारे… मन फक्त वृद्धच व्हायला हवं, दातृत्वाची क्षमता बाळगणारे.