प्रकाश पायगुडे
दिवाळी अंक हे महाराष्ट्राचं आणि मराठी भाषेचं वैभव आहे. दिवाळी अंकांनी साहित्य विश्वात क्रांती केलेली आहे. शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेले हे दिवाळी अंक आज दिवाळीचं आकर्षण ठरलेले आहेत. अनेक साहित्यिक, नवोदित लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार यांच्यासाठी ही एक पर्वणी ठरलेली आहे. १९०६ साली प्रथम मनोरंजनकार का. र. मित्र यांनी पहिला दिवाळी अंक ‘मासिक मनोरंजन’ या माध्यमातून प्रसिद्ध केला. त्याच सुमारास लहान मुलांसाठी आनंद नावाचा दिवाळी अंकही प्रसिद्ध झाला. मनोरंजन हे मासिक का. र. मित्र यांच्या निधनानंतर बंद पडले; परंतु आनंद हे मासिक पुढे शंभर वर्षांहून अधिक काळ टिकले व त्याने आपल्या दिवाळी अंकाची शताब्दी साजरी केली. आजही असे अनेक अंक आहेत, जे शतकाच्या जवळपास येऊन ठेपलेले आहेत. सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वीपासून बहुतेक वृत्तपत्रांनीही आपले दिवाळी अंक प्रसिद्ध करायला सुरुवात केली, त्यामुळे इतर दिवाळी अंकांवरही त्याचा परिणाम झाला. तालुक्याच्या गावातून प्रसिद्ध होणारी छोटी किंवा छोट्या आकाराची दैनिके व साप्ताहिके स्वतःचा दिवाळी अंक काढू लागली.
या दिवाळी अंकांमध्ये आर्थिक गणित दडलेले असते. शहरी दिवाळी अंकाच्या मानाने गावागावांतून प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक आजूबाजूच्या व्यापाऱ्यांकडून, कारखानदारांकडून किंवा व्यावसायिकांकडून जाहिराती मिळवून तेथील स्थानिक लेखकांना, कवींना व साहित्यिकांना संधी देऊन अंक सजवत असतात. त्यांचा दिवाळी अंक फायदेशीर ठरत असतो. त्यामध्ये त्यांनाही दोन पैसे मिळतात व स्थानिक लेखक, व्यापारी यांनाही प्रसिद्धी मिळत असते. शहरी दिवाळी अंक त्यामानाने खूप महागडा असतो. आर्थिक गणिते या दिवाळी अंकाच्या निमित्ताने शहरी भागात व्यस्त प्रमाणात असतात. त्यामुळे बरेच वेळा अंक किफायातशीर ठरत नाहीत. त्याचा परिणाम काही काळातच दिवाळी अंक बंद होण्यामध्ये होतो. शहरात लेखक साहित्यिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात; परंतु दिवाळी अंकांचे आर्थिक गणित बसवण्यासाठी ज्या जाहिराती मिळवाव्या लागतात, त्या पुरेशा प्रमाणात मिळणे अवघड होते. शहरी भागात मोठ्या प्रमाणावर अंक निघत असतात. त्यामुळे जाहिरातदारांवरही ताण पडत असतो. लोकप्रिय असलेल्या दिवाळी अंकांनाच फक्त जाहिराती दिल्या जातात. दिवाळी अंक हे अनेक वेळा हौसेपोटी काढले जातात. त्यामध्ये मालक हाच संपादक असतो. त्याचबरोबर तो लेखन, व्यवस्थापन, छपाई, बांधणी, वितरण, आर्थिक कारभार, कार्यालय व्यवस्थापन म्हणजेच शिपायापासून ते संपादकांपर्यंत सर्व कामे मालकालाच करावी लागतात. दिवाळी अंकांचे आर्थिक गणित बसवण्यासाठी सुमारे सहा महिने झोकून देऊन काम करावे लागते आणि स्वतःभोवती यंत्रणा उभी करावी लागते, तरच दिवाळी अंक यशस्वी होतात. पूर्वीच्या काळी दिवाळी अंक हे फक्त साहित्य या विषयाला वाहिलेले असत. असे अंक प्रसिद्धीच्या उच्च स्थानी पोहोचले होते. विशेषतः दीपावली, ललित, मौज, सत्यकथा, माहेर, मेनका, जत्रा, आवाज, किर्लोस्कर स्त्री, मनोहर असे अनेक अंक फक्त साहित्यासाठी प्रसिद्ध होते. त्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, समीक्षा अशा काही विषयांना ही मासिके व दिवाळी अंक समर्पित केले होते. त्यामुळे त्यातील मनोरंजनासाठी त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर होती. पुढे वाचकांची अभिरूची बदलत गेली आणि विविध विषयावरचे अंक निघू लागले.
त्यात साहित्य काही प्रमाणात व इतर गोष्टी यांचा समावेश असे काही अंक निघाले. फक्त विनोदासाठी वाहिलेले असे तर काही अंक फक्त कथा, कादंबरी यासाठीही असत. त्यामुळे त्यांच्या वाचकांना मर्यादा येत होत्या. पुढे जाऊन लोकांची अभिरुची आणखी बदलत गेली आणि त्यानंतर एका विशिष्ट विषयाला वाहिलेले अंक निघू लागले. उदाहरणार्थ धार्मिक, आरोग्य, ज्योतिष, पाककला, पर्यावरण, विविध स्पर्धा, चित्रपट, नाटक किंवा फक्त मनोरंजन अशा विषयांवर अंक निघू लागले. त्यामुळे ज्या विषयाची आवड असेल, त्याप्रमाणे वाचक हे अंक आवडीने घेऊ लागला.
जे फक्त साहित्याला वाहिलेले अंक होते त्यांच्या वाचकांमध्ये विभाजन झाले व हळूहळू साहित्यासाठीचे अंक मागे पडू लागले. निश्चितच त्याचा व्यवसायावर परिणाम होऊ लागला व काही काही अंक बंद पडू लागले. लेखक, साहित्यिक यांना दिवाळी म्हणजे सुगीचा काळ असे समजले जात होते. पण त्यामध्ये खंड पडला व इतर विषयातल्या तज्ज्ञांना व लेखकांना संधी मिळू लागली. तरीही उच्च दर्जाच्या लेखकांना व साहित्यिकांना आजही खूप मागणी आहे. तीच गोष्ट व्यंगचित्रकारांची. पान पुरके म्हणून व्यंगचित्रे, वात्रटिका, चारोळ्या, विनोद हे साहित्य संपादकांना हवे असते.
या दिवाळी अंकांच्या निमित्ताने चित्रकारांनाही भरपूर काम असते. विशेषतः मुखपृष्ठ करणारे चित्रकार यांना खूप मागणी असते. आकर्षक मुखपृष्ठ ही अंकाची जमेची बाजू असते. खपाच्या दृष्टीने त्याचा खूप फायदा मिळतो. त्यामुळे मुखपृष्ठांमध्ये वैविध्य कसे येईल, आकर्षकता कशी सांभाळली जाईल व लोकांचे वाचकांचे लक्ष कसे खेचून जातील, यावर बरेचसे अवलंबून असते. या व्यतिरिक्त कथेसाठी, कादंबरीसाठी, कवितेसाठी चित्रांची जागेच्या उपलब्धतेप्रमाणे आवश्यकता असते. अंकाचे बाहेरील व अंतर्गत सौंदर्य निर्माण करण्यासाठी चित्रकारांचं मोलाचं योगदान असतं. तसेच या वर्षीचा अंक जितका आकर्षक होईल तितकेच जाहिरातदार आकृष्ट होतात. अर्थातच खपावरही त्याचा चांगला परिणाम परिणाम होतो.
दिवाळी अंकांचे गणित हे आर्थिक गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे एकीकडे दर्जा राखण्याचा प्रयत्न करायचा तर जाहिराती मिळवणे व आर्थिक तोल सांभाळणे यासाठी मालकांना संपादकांना वेळ मिळत नाही व अंक कितीही चांगला असला तरी तोटा आल्यामुळे काही वर्षांत बंद करावा लागतो. तरीही आजही दर वर्षी नवनवीन दिवाळी अंक बाजारात आलेले दिसतात. मराठी माणसाला दिवाळी अंक काढण्याची प्रचंड हौस आहे. हा उत्साह कायम राहावा यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी करणे महत्त्वाचे ठरते. आजमितीला विक्रीसाठी एजंटांकडे येणाऱ्या अंकांची संख्या सुमारे साडेचारशे आहे व विक्रीसाठी न येणाऱ्या अंकांची संख्या काही पटीने जास्त आहे.
दिवाळी अंक चांगल्या पद्धतीने चालावेत व त्यांना जाहिरातीही मिळाव्यात यासाठी चंद्रकांत शेवाळे, विजय पाध्ये व महाराष्ट्रातल्या इतर दिवाळी अंक काढणाऱ्या संपादकांनी ‘दिवा’ वार्षिक ही संघटना सुरू केली व त्यायोगे अंकांना जाहिराती कशा मिळतील व स्थैर्य कसे येईल, अशी रचना केली आहे. त्याचा योग्य तो फायदा दिवाळी अंकांना झालेला आहे. आजही मराठी वाचक दिवाळी आली किंवा दसरा संपल्यावर दिवाळी अंकांची वाट पाहत असतात. चांगल्या दिवाळी अंकांवर लक्ष ठेवून असतात व तो कधी बाजारात येईल, याची प्रतीक्षा करत असतात. आपल्याला हव्या असलेल्या अंकांची नोंदणीही एजंटाकडे करून ठेवतात. गेल्या काही वर्षांपासून तीन किंवा पाच दिवाळी अंकांनी एकत्र येऊन एक गट तयार करून वाचकांना काही पॅकेजेस दिली आहेत. त्यातून हे अंक स्वस्त दरात मिळू शकतात व त्यासोबत काही पुस्तके दिवाळीनिमित्त भेटही दिली जातात. या योजनेलाही भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.
सध्या साहित्य विषयक अंकात मौज, दीपावली, ललित, माहेर, मेनका, धनुर्धारी, पद्मगंधा, किस्त्रीम विनोदी अंकात आवाज आरोग्य विषयक शतायुषी आणि ज्योतिष विषयक ग्रहांकित या अंकांना प्रचंड मागणी आहे. दिवाळी अंकाच्या आवृत्ती (पुनर्मुद्रण) काढण्याची १९९६ सालापासून ग्रहांकितवर वेळ सातत्याने आली आहे.
दिवाळी अंक हे खरोखरच शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. अर्थात जे लोकप्रिय अंक आहेत, त्यांना इतका विचार करावा लागत नाही; परंतु ज्यांची परिस्थिती दोलायमान असते त्यांना प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो. या संघर्षातूनही हे मालक, लेखक, संपादक दिवाळी अंक काढून मराठी मुलखातील आणि जिथे जिथे मराठी वाचक रसिक आहेत, त्यांचे वर्षानुवर्ष मनोरंजन करत आहेत. हेच या दिवाळी अंकांचं संचित आहे, असं म्हणावं लागेल.
जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…
उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…