नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाला असून तिन्ही वेळा समोर आलेल्या जनावरांना या रेल्वेने धडक दिली आहे. गुजरातमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाल्यामुळे तिच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. वलसाडच्या अतुल रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला, एक गाय अचानक रेल्वेच्या समोर आल्यामुळे ही धडक झाली.
शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारानंतर जवळपास अर्धा तास वंदे भारत एक्स्प्रेस अतुल रेल्वे स्थानकावर उभी ठेवण्यात आली होती. या अपघातामध्ये रेल्वेच्या कपलरच्या कव्हरचेही नुकसान झाले असून बीसीयू कव्हरचेही नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, रेल्वेमध्ये पाणीपुरवठा करणारा पाण्याचा पाईपदेखील नादुरुस्त झाला. या अपघातामध्ये प्रवाशांना कोणतेही नुकसान झाले नाही.
१ ऑक्टोबरपासून वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. मात्र, पहिल्या महिन्याभरातच तीन वेळा या एक्स्प्रेसला छोटे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रत्येकवेळी समोर आलेल्या जनावरांना धडक दिल्याने वंदे भारत एक्स्प्रेसचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.