अलिबाग (प्रतिनिधी) : पर्यटकांअभावी कोरोनाकाळात दोन वर्षे अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे व्यावसायिकांबरोबर त्यावर अवलंबुन असणाऱ्या प्रत्येक घटकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यंदा मात्र करोनाचे निर्बंध नसल्याने दिवाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले अलिबागकडे वळल्याने अलिबाग तालुक्यातील सर्वच पर्यटन स्थळे गजबजू लागली आहेत. त्यामुळे या व्यवसायवर जगणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
रायगड जिल्ह्याची राजधानी म्हणून अलिबागकडे पाहिले जाते. पूर्वी समुद्रकिनारी वसलेले एक छोटसे आणि नारळी – फोफळींच्या गर्दझाडीत दडलेले असे ‘अलिबाग’ हे गाव होते; परंतू या अलिबागचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षात बदलून गेला आहे. अलिबाग शहरासह तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असतानाच दुसरीकडे सारळ, रेवस बंदर, मांडवा बंदर, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल, रेवदंडा येथील समुद्रकिनारेही पर्यटकांनी गजबजू लागली आहेत. पर्यटकांच्या वाढत्या ओघाने येथील लॉजिंग-बोर्डींग, रिसॉर्ट, फार्म हाऊसेस, मोठाली हॉटेल्स, अलिबागचे मासळी मार्केट, भाजी मार्केट, घरगुती खाद्यपदार्थ, घरगुती खाणावळ, रिक्षा-चालक- मालक, टॅक्सी चालक-मालक, समुद्रकिनाऱ्यांवर विविधप्रकारचा व्यवसाय करणारे घोडागाडीवाले, बोटींग, भेलपुरीवाले, घोडेवाले, विक्रेते, लाँच मालकांना यामुळे चांगले सुगीचे दिवस आले आहेत.
कोरोना लॉकडाऊन काळात अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील बहुतांशी व्यवसायिकांना मोठा फटका बसला होता. अनेकांनी कर्ज घेऊन आपापले व्यवसाय सुरू केले होते; परंतू हा व्यवसायच ठप्प झाल्याने बँकेसह पतसंस्थांचे कर्ज कसे फेडायचे, तसेच कुटुंबाचे पोट कसे भरायचे असा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा ठाकला होता. लॉकडाऊननंतर अलिबाग तालुक्यातील पर्यटनस्थळे मागच्यावर्षी १५ ऑगस्टपासून खुली झाली होती. तरीही कोरोनाच्या भीतीने अलिबाग समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत नसल्याने त्यांच्या धंद्यावर अधिक परिणाम होताना दिसत होता. पण दिवाळीनिमित्त या व्यवसायिकांना अच्छे दिन बघायला मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज आल्याचे दिसून आले.
सागरीमार्गाने अलिबाग हे मुंबईला जवळ असल्याने गेटवे ते मांडवा, भाऊचा धक्का ते रेवस बंदर या दरम्यान प्रवाशी वाहतूक करणाऱ्या लाँच सेवा भरभरून येत-जात असतात. पावसाळा वगळता उर्वरित काळात पर्यटकांचा अधिक ओघ अलिबाग तालुक्यात एक दिवसीय पर्यटनासाठी असतो. तसेच या दिवाळीत जोडून लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्याने मोठ्यासंख्येने पर्यटक अलिबागमध्ये दाखल झाल्याने शहरातील सर्वच रस्ते गजबजून गेल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे अलिबाग समुद्रकिनाऱ्यालगत असलेले क्रीडा भुवनचे मैदानही वाहनांच्या पार्किंगमुळे भरून गेल्याचे दिसून आले. याशिवाय राहण्याची ठिकाणेही सध्या हाऊसफुल्ल झालेली असून, व्हेज-नॉनव्हेजची हॉटेल दुपार आणि रात्रीच्या जेवणाच्या काळात खचाखच भरलेली दिसून येत आहेत. काहींना उपहारगृहांमध्ये जेवणासाठी जागाच मिळत नसल्याने काही पर्यटक हातगाडीवरील खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे अलिबाग शहरात येणारे बरेचसे पर्यटक वॉटरस्पोर्टसचा अधिकतेने आनंद घेताना दिसून येत होते.