Friday, November 8, 2024
Homeदेशटाटा-एअरबस प्रकल्पाचा महाराष्ट्राला टाटा!

टाटा-एअरबस प्रकल्पाचा महाराष्ट्राला टाटा!

प्रदीप पेशकार यांची टीका

हे तर ठाकरे सरकारच्या कोलदांडा प्रवृत्तीचे पाप

नाशिक (प्रतिनिधी) : सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडीचे संयोजक प्रदीप पेशकार यांनी केली आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे करून आता उलटा कांगावा सुरू केला, असा आरोपही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मेक इन इंडिया’ आणि  ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत संपूर्ण देशांतर्गत विमान निर्मितीच्या या प्रकल्पासाठी ८ सप्टेंबर २०२१ रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच २४ सप्टेंबर २०२१ रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. एअरबस आणि टाटा यांच्यातील करारानुसार संयुक्तपणे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पास संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविल्याचे रतन टाटा यांनी त्याच दिवशी जाहीरही केले. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही. वा कोणता पाठपुरावा केला नाही. या वस्तुस्थितीची माहिती असताना, निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान प्रदीप पेशकार यांनी दिले.

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबतही ठाकरे सरकारने असाच बेजबाबदारपणा दाखवून तो प्रकल्प घालविला. या प्रकल्पातूनही वाटाघाटीद्वारे वसुलीचा छुपा हेतू तर नव्हता ना, अशी शंकाही पेशकार  यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -