Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसमर्थक आणि समर्थ ग्राहक

समर्थक आणि समर्थ ग्राहक

मंगला गाडगीळ

स्थळ, कॉलेज कट्टा, वेळ, अर्थातच कोणतीही (कॉलेज सुटल्यावर किंवा लेक्चर बंक केलेले असताना) ‘ए, सुश, ऐक ना. काल मिनीने तिचा एक फोटो फेसबुकवर टाकला, तर त्याला ३२८ लाईक्स मिळाले, ग्रेट ना!’ त्यावर सुश म्हणाली, ‘हे तर काहीच नाही. मागच्या आठवड्यात गीतेशने एक रील इंस्टावर टाकली तर त्याला १११३ लाईक्स मिळाले. आता बोल. आपणही असं काही तरी केलं पाहिजे, यार’. वाचकहो, लेखाचे शीर्षक आणि वरील संवाद याचा काय बरं संबंध असेल, अशा विचारात पडलात ना! हाच तर आहे जाहिरातीचा नवीन फंडा. आज जवळजवळ प्रत्येकजण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतोच. ही सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, इंस्टा किंवा यू ट्यूब, टिक टॉक, व्हाॅट्सअॅप वगैरे. कुठे ना कुठे आपला अकाऊंट असतोच. तरुणाईचा तर प्रत्येक ठिकाणी. आता लक्षात घ्या की, समजा या संदेशात किंवा व्हीडिओत त्याने म्हटले असेल की, मी अमूक एक सिनेमा पाहिला, तो मला प्रचंड आवडला किंवा अमूक एका हॉटेलातील अमूक एक खाद्यपदार्थ भन्नाट आहे, तर काय होऊ शकेल? त्यांच्या संपर्कातील काहीजण तरी तो सिनेमा बघायला जातील किंवा त्या हॉटेलात जाऊन तो पदार्थ ‘ट्राय’ करतील. मग काय, सिनेमा प्रोड्युसर आणि हॉटेल मालकाची चांदीच चांदी.

नेमकी हीच नाडी पकडून उत्पादक मंडळी अशा नेटकऱ्यांचा उपयोग जाहिरातीसाठी किंवा ‘प्रमोशन’साठी करू लागले आहेत. आजच्या डिजिटल जगात यांना ‘इन्फ्लुएन्सर्स’ किंवा समर्थक म्हटले जाते. या समर्थकाने आपल्या अकाऊंटवर फक्त एखाद्या उत्पादन किंवा सेवेबद्दल चांगले म्हणायचे. समर्थकांचे म्हणणे बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत असल्याने त्याचा चांगलाच प्रभाव पडतो असे लक्षात आले आहे.

या समर्थकांत सामान्य लोकांपासून खेळाडू, नट कोणीही असते. या समर्थकांनी एक कहाणी (बहुतेक वेळा रचलेली) आपला अनुभव म्हणून सांगितली, तर त्याचा खूपच प्रभाव पडतो. सुरुवातीला निरनिराळ्या डिजिटल पद्धती वापरून उत्पादक समर्थकांची माहिती गोळा करतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या उत्पादनाचे समर्थन करण्याचे काम दिले जाते. यांचे छोटे-मोठे गट केले जातात. लाखो फॉलोअर्स त्यांचा एक गट, हजारो असतील तर दुसरा एक गट वगैरे. या फॉलोअर्सच्या आकड्यांवर समर्थकांचे मानधन ठरते.

पुढे जाण्याअगोदर आता सिंगापूरचेच एक उदाहरण पाहू. काही माहिती/अभ्यास नसताना सोशल मीडियावर क्रिप्टो करन्सी विकत घेण्यासाठी अशाच अनेक समर्थकांनी जोरदार भलामण केली. त्यावर नंतर एक दिवस रातोरात एक्सचेंजने पैसे काढून घेण्यास मनाई केली आणि बंदी घातली गेल्यामुळे लोकांना क्रिप्टो करन्सी विकताही येईना. सिंगापूरमध्ये जणू धरणीकंपच आला. एका महिन्यात क्रिप्टोचे भाव ३०%ने उतरले. लोकांचे प्रचंड प्रमाणात म्हणजे १५ लाख करोड रुपयांचे नुकसान झाले. समर्थकांना मात्र कसलीही तोशीस न लागता, या कामासाठी लाखो रुपये मिळाले.

जाहिरातीचा हा प्रकार आता चांगलाच जम बसवू लागला आहे. एका अंदाजानुसार अशा प्रकारच्या समर्थानांसाठी २०२१ मध्ये ९०० करोड रुपये खर्च करण्यात आले होते. २०२५ मध्ये हाच आकडा तब्बल २२०० करोड रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. एका अर्थी हे समर्थक वस्तूचे किंवा सेवेचे ‘ब्रँड अम्बॅसॅडर्स’ असतात. जेव्हा अशा समर्थकांचा फारच बोलबाला झाला, तेव्हा सरकारच्याही लक्षात आले की, ही सुद्धा एक प्रकारची जाहिरातबाजीच आहे. त्यामुळे यावरही अंकुश असायलाच हवा. सेंट्रल कंज्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी (CCPA) मार्फत काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. उदाहरणार्थ कायद्याने या समर्थनाला जाहिरात असेच संबोधण्यात येईल आणि त्यामुळेच जाहिरातविषयक सर्व नियम त्यांना लागू असतील. तसेच ज्या उत्पादनाबद्दल काही म्हणायचे आहे त्याची समर्थकाने पूर्ण माहिती आधी घ्यावी, आपण जे काही म्हणत आहोत त्याची पूर्ण जबाबदारी घ्यावी.

CCPAच्या आयुक्त श्रीमती निधी खरे यांनी मार्गदर्शक सूचनांबद्दल बोलताना म्हटले, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना रोखण्यासाठी या सूचनांचा उपयोग होईल. सोशल इन्फ्लुएन्सर्सनी सूचनांचे पालन योग्य प्रकारे केले पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. जेव्हा आपण टीव्हीवर एखादी जाहिरात बघतो तेव्हा आपल्याला पक्के माहीत असते की, जाहिरातीतील नट/सेलिब्रिटी यांचे जाहिरातदाराबरोबर काही आर्थिक नाते आहे. इंटरनेटवर जेव्हा ग्राहक एखाद्या उत्पादनाची समीक्षा बघतो तेव्हा परिस्थिती वेगळी असते. ग्राहकाला त्या उत्पादनाबद्दल विशेष उत्सुकता असते. ती वस्तू तो विकत घेण्याची बरीच शक्यता असते. म्हणूनच ही समीक्षा निरागस आहे की पैसे घेऊन केलेली आहे, यात स्पष्टता असावी. स्वत:चा खुलासा करणारा उल्लेख स्पष्टपणे समीक्षेत असावा. ही जाहिरातच आहे हे सहजपणे ओळखता यावे. जाहिरातींचे सर्व नियम लागू करण्यामुळे ग्राहकांचे अधिकार जपले जातील. नियम मोडणाऱ्यांवर अनुचित व्यापार प्रथेचा वापर केल्याचा आरोप होईल. पहिल्यांदा नियम मोडणाऱ्यास जास्तीत जास्त १० लाख रुपयांचा दंड होईल. त्यानंतरसुद्धा नियम मोडला गेला, तर ५० लाख व/वा कैदेची शिक्षा होईल शिवाय १ वर्ष ते ३ वर्षांपर्यंत बंदी घालण्याचेही निर्देश आहेत.

तेव्हा ग्राहकहो, असे समर्थक आपल्याला ओळखता आले पाहिजेत. समर्थक आपल्या नात्याचा/ओळखीचा आहे म्हणून त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता कामा नये. त्याने त्या उत्पादनाचा काय अभ्यास केला आहे हेही तपासले पाहिजे. नाहीतर नवीन काहीतरी ‘ट्राय’ करायला जाऊ आणि आपले नुकसान करून घेऊ. लक्षात असू द्या की, स्वतःची दिशाभूल होऊ न देणे हे सुद्धा जागरूक ग्राहकाचे लक्षण आहे. सरकार आपले काम करतच आहे तरी सुद्धा आपण आपल्याच हक्कांचे रक्षण करून समर्थ ग्राहक बनू या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -