नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील पोलिसांच्या गणवेशासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाचे भाष्य केले आहे. त्यानुसार ‘एक देश, एक पोलीस, एक गणवेश’ ही व्यवस्था आणण्याबाबत राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांना चर्चा करावी असे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करताना त्यांनी आवाहन केले आहे.
पोलीस हा राज्यसूची अतंर्गत असणारा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याने आपापल्या पोलिसांसाठी वेगवेगळा गणवेश डिझाईन केलेला आहे. मात्र, ‘एक देश, एक पोलीस, एक गणवेश’ या संकल्पनेवर चर्चा सुरु व्हावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. दरम्यान, या व्यवस्थेचे फायदे देखील पंतप्रधानांनी सांगितले आहेत. ते म्हणाले, एकतर गणवेशासाठी मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी गणवेशाचे कापड तयार होणार असल्याने ते दर्जेदार असेल.
त्याचबरोबर कॅप, बेल्ट यासाठी एकाच वेळी मोठी मागणी असेल. देशातील कोणताही नागरिक कोणत्याही भागात जाईल तेव्हा त्याला कळेल की, हा पोलीसवाला आहे. त्यामुळं ‘एक पोलीस, एक गणवेश’ ही संकल्पना महत्वाची आहे. फक्त त्यांच्या गणवेशावर संबंधित राज्याचा टॅग किंवा नंबर असू शकतो, असेही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
यापूर्वी संरक्षण दलासाठी ‘वन रँक, वन पेन्शन’, ‘एक नेशन, वन कार्ड’, ‘वन नेशन, वन गोल्ड रेट’ ही सिस्टीमही केंद्राकडून लागू करण्यात आली आहे. तर काहींवर विचार सुरु आहे. यामध्ये आता ‘वन नेशन, वन पोलीस, वन युनिफॉर्म’ या योजनेचा समावेश होण्याची शक्यता आहे.