मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांनी शुक्रवारी २८ ऑक्टोबरला घरमालकांसाठी नवीन परिपत्रक जारी केले आहे. मुंबईतील जे घरमालक आपली जागा भाड्याने देऊ इच्छित आहेत, अशा घर मालकांसाठी एक सूचना जारी करण्यात आली आहे.
मुंबईचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी परिपत्रकाद्वारे हा आदेश जारी केला आहे. हा आदेश ६ नोव्हेंबर २०२२ पासून अमलात येईल. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम १८८ अंतर्गत दंडनीय असेल.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही घरमालकाला आपल्या घरात भाडोत्री ठेवण्यापूर्वी घरमालकाने तत्काळ घर भाड्याने घेणाऱ्या व्यक्तींचा तपशील पोलिसांना सादर करावा. मुंबई पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तपशील देता येईल.
भाड्याने घर दिलेली व्यक्ती परदेशी असेल, तर घरमालकाने परदेशी व्यक्तीचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट तपशील जसे की पासपोर्ट क्रमांक, ठिकाण, जारी करण्याची तारीख आणि वैधता सादर करावी. व्हिसा तपशील उदा व्हिसा क्रमांक, श्रेणी, ठिकाण आणि जारी करण्याची तारीख, वैधता, नोंदणी ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण याची माहिती सुद्धा पोलिसांना द्यावी. मुंबई पोलीसांनी सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.