मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सणापासून मुंबईत सुरू झालेले आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी पहाटे कुर्ला येथे, तर दुपारच्या सुमारास भायखळा येथे एका इमारतीत आग लागल्याची घटना घडली. सहा दिवसांत फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या घटनांची संख्या ही ६४ झाली आहे. तर एकूण १५५ आगीच्या घटना समोर आल्या आहेत.
दरम्यान, गिरगावात लागलेल्या आगीनंतर शुक्रवारी पहाटे कुर्ला येथे, तर दुपारच्या सुमारास भायखळा येथे एका इमारतीत आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाने एका तासातच आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान दिवाळी कालावधीत फटाक्यांमुळे सहा दिवसांत १५५ आगीच्या घटना घडल्या असून यात ६४ घटना फटाक्यांमुळे लागल्या आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे निर्बंध असल्यामुळे दिवाळीचा उत्साह फारसा नव्हता. मात्र यंदा जोरदार दिवाळी साजरी झाल्यामुळे फटाकेही वाजवण्यात आले. या फटाक्यांमुळे यंदा आगीच्या ६४ घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी केवळ ४१ आगीच्या घटना घडल्या. २०२० मध्ये दिवाळीत आगीच्या ३३ घटना घडल्या होत्या.
यंदा २२ ऑक्टोबरला १७ ठिकाणी आगीच्या घटनांची नोंद झाली असून त्यापैकी २ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. २३ ऑक्टोबरला २७ आगीच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी ७ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. २४ ऑक्टोबरला ४१ ठिकाणी आगीचे प्रकार समोर आले. त्यापैकी २८ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. २५ ऑक्टोबरला ३६ आगीच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी १२ ठिकाणी आग फटाक्यामुळे लागली. २६ आणि २७ ऑक्टोबरला ३४ आगीच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी १५ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली.