नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक महानगरपालिका आता आपल्या सिटी लिंक या बस सेवेमध्ये विस्तार करणार असून इलेक्ट्रिक बसचा समावेश करणार आहे. त्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाची मदत घेतली जाणार आहे.
सिटी लिंक बसचा दुसऱ्या टप्प्यात विस्तार केला जाणार असून त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांच्या अंमलबजावणीचे कारण देत केंद्र शासनाच्या ‘फेम-२’ योजनेंतर्गत ५० इलेक्ट्रिक बस खरेदीचा फेरप्रस्ताव पालिकेने केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाला सादर केला आहे. या योजनेंतर्गत महापालिकेला प्रति बस अधिकतम ५५ लाखांचे अनुदान केंद्राकडून प्राप्त होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून राज्य परिवहन महामंडळाची तोट्यातील बससेवा नाशिक महापालिकेच्या माथी मारली गेली. बस सुरू होण्यापूर्वीच बीएस-४ या कालबाह्य झालेल्या तंत्रज्ञानाच्या मॉडेलमुळे वादात सापडली. त्यानंतर कोरोना कालावधी सुरू झाल्यामुळे अनेक अडचणी आल्या.
अखेर फडणवीस यांनी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून ‘सिटी लिंक – कनेक्टिक नाशिक’ या नावाची बससेवा जुलै २०२१ पासून सुरू केली आहे. बससेवेंतर्गत ५० डिझेल आणि २०० सीएनजी बसेस नाशकात धावत आहेत. सर्वसाधारणपणे महिन्याला पाच कोटी रुपयांचा खर्च होत असून तितके उत्पन्न मिळत नसल्यामुळे बससेवेचा पाय खोलात शिरत आहे.
तोट्याच्या मार्गावरील बसेस बंद करण्याचे सोडून नवीन बसेस वाढवण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे दिवाळखोरीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. इलेक्ट्रिक बस खरेदी ही सीएनजी व डिझेल बसप्रमाणेच ठेकेदारांमार्फतच केली जाईल. शासनाकडून मिळणारे अनुदान ठेकेदाराला दिल्यानंतर त्या बदल्यात महापालिका प्रति किलोमीटर दरात सवलत घेईल.