Friday, March 21, 2025
Homeदेशफक्त गन नव्हे तर पेन घेतलेल्या नक्षलवादाचाही बिमोड करा

फक्त गन नव्हे तर पेन घेतलेल्या नक्षलवादाचाही बिमोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

फरिदाबाद : देशात फक्त बंदूक हाती घेतलेले नक्षलवादी नसून लेखणीच्या माध्यमातून युवकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही प्रकारच्या नक्षलवादाचा बिमोड करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. फरिदाबाद येथे सुरू असलेल्या राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांच्या चिंतन शिबिराला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबोधित करताना म्हटले की, तरुणांच्या भावनांचा गैरफायदा घेतला जात आहे. देशाची राष्ट्रीय एकात्मता बिघडवणाऱ्या शक्तींना पराभूत करण्यासाठी बौद्धिक क्षमताही वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय संविधान, कायदा, व्यक्ती स्वातंत्र्याची भाषा या विघातक शक्तींकडून वापरली जाते. साध्या भोळ्या चेहऱ्या मागील देशविघातक शक्ती ओळखणे गरजेचे असून त्यासाठी पोलिसांनी अधिक सक्षम राहावे, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

केंद्रीय तपास संस्थांना विविध राज्यांमध्ये तपास करावा लागतो. राज्यांनी देखील तपास यंत्रणांना सहकार्य केले पाहिजे, ही त्यांची जबाबदारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कोणतीही तपास यंत्रणा असो, राज्यांचे पोलीस असो, प्रत्येकांने एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुमजली पोलीस ठाणे उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तळ मजल्यावर पोलीस ठाणे असेल आणि इमारतीच्या इतर मजल्यावर पोलिसांसाठी घरे असतील. त्यामुळे शहरापासून दूर राहणाऱ्या पोलिसांची मोठी समस्या सुटेल असे त्यांनी म्हटले. पोलिसांनी सरकारच्या धोरणांनुसार जुन्या वाहनांचा वापर करण्याचे टाळले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

सोशल मीडियाला कमी लेखू नये, असेही पंतप्रधानांनी म्हटले. सोशल मीडियावरून खोट्या बातम्या, अफवा वेगाने पसरतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कोणतीही बातमी फॉरवर्ड करण्याआधी १० वेळा विविध वृत्तसंस्थांकडून पडताळणी करून घ्या, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

‘एक देश एक पोलीस गणवेश’

‘एक देश, एक पोलीस गणवेश’ याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रह धरला. माझे मत मी थोपवू इच्छित नाही. पण, देशातील पोस्ट खात्याच्या धर्तीवर देशभरातील पोलिसांसाठी एकच गणवेश असावा अशी सूचनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -