Friday, June 20, 2025

मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेताच 'सीईओ'सह अनेकांची केली हकालपट्टी

मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेताच 'सीईओ'सह अनेकांची केली हकालपट्टी

सॅन फ्रान्सिस्को (वृत्तसंस्था) : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी नुकताच ट्विटरचा ताबा घेतला आहे. यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थांची हकालपट्टी केली आहे.


ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगल आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मस्क यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नेड सेहगल आणि पराग अग्रवाल हे दोघंही सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्यालयात उपस्थित होते, त्यावेळी त्यांना ट्विटरमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. एलॉन मस्क यांनी पराग अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांच्या संख्येबद्दल ट्विटर गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता.


दरम्यान, जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करून ताब्यात घेतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्विटरसोबत जी डील होती त्याचा वाद सुरू होता. सुरूवातीला ४४ अब्ज डॉलर्सची ऑफर देत एलन मस्क ट्विटर खरेदी करणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र यातून त्यांनी काढता पाय घेतला आणि ही डील फिस्कटली होती. त्यानंतर ट्विटरने न्यायालयात धाव घेतली. ज्यामुळे ट्विटर खरेदी करणं किंवा कारवाईला सामोरं जाणं हे दोनच पर्याय मस्क यांच्यापुढे उरले होते.

Comments
Add Comment