भाजप आमदार नितेश राणेंची मागणी; म्हणाले- ‘ये परफेक्ट है’
मुंबई : नोटांवर लक्ष्मी आणि विघ्नहर्त्या गणेशाचा फोटोही असावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट शेअर करत नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटा हवा, अशी मागणी राणे यांनी केली आहे. त्यामुळे देशासह राज्यात नव्या वादाला तोंड फुटले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीजींसोबतच श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो छापा, अशी अफलातून मागणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केली. त्यानंतर नितेश राणे यांनी महाराष्ट्रातून शिवरायांच्या फोटोंची मागणी केली आहे.
आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली दोनशे रूपयांची नोट शेअर केली आहे. आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट शेअर केली आहे. त्याला राणे यांनी ‘ये परफेक्ट है’ अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
Ye perfect hai ! 😊 pic.twitter.com/GH6EMkYeSN
— nitesh rane (@NiteshNRane) October 26, 2022
‘लक्ष्मीला समृद्धीची देवी मानले जाते, तर गणपती विघ्नहर्ता आहे. आम्ही सर्व नोटा बदला असे सांगत नाही. किमान नवीन नोटांवर ही सुरुवात तर भारतीय अर्थव्यवस्था रूळावर केली जाऊ शकते, असे केजरीवाल म्हणाले. इंडोनेशियात ८५ टक्के मुस्लीम आणि केवळ दोन टक्के हिंदू आहेत. मुस्लीम राष्ट्र असूनही तिथल्या नोटांवर गणपतीचे छायाचित्र असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी केली आहे. केजरीवाल हे धर्माची नशा विकण्याचे काम करीत आहेत. त्यांच्यात व मोदींमध्ये फारसा फरक नाही. चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का नाही? असा सवाल काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याला नवे वळण लागले आहे.