ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ कोणी शोधू नये, असे म्हणतात. पण नावात ऋषी असलेली व्यक्ती एकेकाळी जगातील शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशाचा पंतप्रधान झाल्यास तो मूळ कोणत्या देशाचा? हा प्रश्न मनात आल्यास वावगे काय… ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याने भारतीयांची छाती अभिमानाने भरून गेली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा रोमहर्षक लढतीत पराभव करत एक प्रकारे भारतीयांना दिवाळी गिफ्ट दिली होती. तशीच काहीशी भारतीयांना सुखावणारी आणखी एक आनंदाची घटना काल घडली. हिंदू धर्मीय आणि मूळचे भारतीय वंशांचे ऋषी सुनक यांच्यावर ब्रिटिश सरकारने विश्वास टाकत त्यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ टाकली आहे.
ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर १५० वर्षे राज्य केले, त्या देशाच्या सर्वोच्च पदावर भारतीय वंशाची व्यक्ती बसली आहे. एके काळी ब्रिटिश राजवटीचा एवढा दबदबा होता की, साम्राज्यांवरील सूर्य कधी मावळत नव्हता. मात्र आजच्या घडीला त्या देशातील अर्थव्यवस्था वाईट स्थितीत असताना तिला सावरण्याचे काम ४२ वर्षीय ऋषी सुनक यांना करावे लागणार आहे. बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर सत्ताधारी हुजूर पक्षात लिझ ट्रस आणि ऋषी सुनक यांच्यात झालेल्या मतदानात लिझ ट्रस यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. यावेळी दोघांनी प्रचार केला होता. ट्रस यांनी करकपातीचे स्वप्न दाखवले होते, तर सध्याच्या परिस्थितीत जनतेला करसवलत देणे शक्य नाही, असे ठामपणे सुनक यांनी प्रचारात सांगितले होते. साहजिकच करसवलतीचे, इंधनकपातीचे स्वप्न दाखवणाऱ्या लिझ ट्रस यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला आणि ट्रस यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली.
कोरोना काळानंतर देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्याबरोबर प्रचारात दाखवलेली स्वप्न सत्यात आणता आली नाहीत म्हणून ट्रस यांना पुन्हा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यातूनच अवघ्या ४४ दिवसांतच त्यांच्यावर पदत्यागाची वेळ आली. परिणामी दणदणीत बहुमत असलेल्या हुजूर पक्षावर पुन्हा एकदा नेता निवडायची वेळ आली आणि गेल्या वेळची चूक या पक्षाने सुधारत ऋषी सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. प्रॉटेस्टंट ख्रिश्चन बहुसंख्येने राहत असलेल्या या देशाचा पंतप्रधान, देशाबाहेरील बिगरधर्मीय असतानाही तेथील जनतेने जो सुनक यांच्यावर विश्वास दाखवला आहे, त्याबददल ब्रिटिश नागरिकांचे मनापासून आभार मानायला हवेत. उदारमतवाद हा केवळ ‘वसुधैव कुटुंबकम्’ यासारख्या वचनांपुरताच मर्यादित न राहता आचरणात आणण्याचे काम सुनक यांच्या रूपाने या सरकारने साकार केले आहे. या आधी अमेरिकेत भारतीय वंशाच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे उदाहरण डोळ्यांसमोर आहेच. मात्र सुनक यांच्या निवडीमागे त्यांचे कर्तृत्वही हे प्रमुख कारण आहे. अर्थमंत्री असताना त्यांनी देशाला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. तो त्यांचा अनुभव हा ब्रिटिश अर्थव्यवस्था गंटागळ्या खाताना असताना त्याला पैलतीरावर नेण्याचे शिवधनुष्य सुनक यांना पेलावे लागणार आहे.
भारतातील अनेक प्रांतातील मंडळी स्वातंत्र्यपूर्व काळातही व्यवसाय-उद्योगधंद्याच्या निमित्ताने परदेशात गेली आणि तिथेच स्थायिक झाली आहेत. सुनक कुटुंबीय हे त्यातील एक. क्रिकेटचे सामने आपण पाहतो त्यावेळी प्रेक्षकगृहात हातात तिरंगा घेऊन नाचणारी मंडळी आपल्याला अन्य देशांत मोठ्या प्रमाणात दिसतात. भारतीय संघ मैदानात उतरतो, तेव्हा या मूळ भारतीय वंशाच्या मंडळींमधील देशप्रेम कसे उफाळून येते, याचा प्रत्यय अनेकदा आपल्याला आला आहे. सिंधी-पंजाबी वा गुजराती-मारवाडी कुटुंबे तसेच केरळ-तामिळनाडू राज्यातील अनेक तरुण हे व्यवसायसंधीच्या शोधात पूर्वी आफ्रिकेसारख्या देशात गेल्याची उदाहरणे आहेत. १९६० नंतरच्या दशकात आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेमुळे त्याकाळी अनेक भारतीय लोक ब्रिटन, अमेरिका किंवा अन्य देशात स्थिरावले. लंडनच्या साऊथ हॉल, वेम्ब्ले आदी उपनगरांत छोटे-मोठे उद्योग करून उदरनिर्वाह करणाऱ्या मूळ भारतीय लोकांची संख्या मोठी आहे. अशाच कुटुंबात वाढलेल्या ऋषी सुनक यांनी पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बाजी मारली आहे. आता ते त्या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाले आहेत. सुनक हे भारतीय वंशाचे आहेत. तसेच त्यांची दुसरी ओळख म्हणजे ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण-सुधा मूर्ती यांची कन्या ही सुनक यांची पत्नी आहे. त्यामुळे भारताचा जावई आज ब्रिटनचा पंतप्रधान झाल्याने सासरवाडीच्या मंडळींना जो आनंद होतो, तोच आनंद आज भारतीयांना झाला असावा. राजकारणात येण्याअगोदर त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जिद्दीने प्रथिथयश हार्वर्डसारख्या विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. पहिल्यांदा खासदार झालेल्या सुनक यांनी भगवद्गीतेला साक्ष ठेवून शपथ घेतली तेव्हा त्यांची नाळ भारताच्या मातीशी किती घट्ट आहे, याचा प्रत्यय आला होता.
दोन-अडीच वर्षांपूर्वी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सुनक यांच्यावर विश्वास दाखवत अर्थमंत्रीपदाची जबाबदारी दिली. कोरोना काळात जगभरात आर्थिक संकट घोंघावत असताना अनेक उपाययोजना करून सुनक यांनी ब्रिटिश अर्थव्यवस्था कोलमडू नये याची दक्षता घेतली. कुशल मनुष्यबळ नसल्याची कमतरता ब्रिटनला भासत आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशाबरोबर करार केल्यास, ब्रिटन सरकारला कौशल्य निपुण मनुष्यबळ सहज आणि चांगल्या रितीने उपलब्ध होऊ शकेल. भारत सरकार आणि ब्रिटन सरकार यांनी भविष्यात पूरक परराष्ट्रीय धोरण अवलंबिल्यास त्याचा फायदा दोन्ही देशांना होऊ शकेल.