वसई : वसईत सोमवारी तब्बल सहा ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. काल दिवसभरात वसई, विरार आणि नायगावमध्ये आगीच्या सहा घटना घडल्या. फटाक्यांमुळे पाच ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या तर घरातील एसी जळाल्याने एका बंगल्याचे नुकसान झाले. यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
विरारमध्ये सोमवारी फटाक्यांच्या ठिणगीमुळे तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. विरार पूर्वेच्या गोपचर पाडा येथे कापसाच्या गाळ्याला फटाक्याची ठिणगी लागून आग लागली होती. गोदामातील संपूर्ण कापूस जळून खाक झाला. वसई विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आग नियंत्रणात आणली.
विरार पूर्वेच्या मोहक सिटी येथे इमारतीच्या कन्स्ट्रक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या बांबूच्या स्टोरेजला रॉकेटची ठिणगी पडून आग लागली होती. येथे ही वसई विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोहचून आग नियंत्रणात आणली होती.
नायगांवच्या टिवरी येथे नक्षत्र प्रिमायसेस या टॅावरमधील अकराव्या मजल्यावर एका घराला रॅाकेटमुळे आग लागली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास ही आग लागली. वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाकडून त्वरीत आग विझवण्यात आली. मात्र घराचे थोडे नुकसान झाले.
विरार पश्चिमेच्या नवापूर येथे ही रॉकेटच्या ठिणगीमुळे एका नारळाच्या झाडाला आग लागली होती. तिथेही वसई विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग नियंत्रणात आणली.
वसई पश्चिमच्या अंबाडी रोड येथील सत्यम बंगल्यात राहणाऱ्या शाह कुटुंबियांच्या घरातील वाताणुकूलीन यंत्राने अचानक पेट घेतला. मात्र फटाक्यांची दुकाने आणि अग्निशमन केंद्राच्या कर्मचा-यांनी तातडीने धाव घेत मोठी दुर्घटना होण्यापासून वाचवले. आगीची घटना घरातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. येथील बंगला आणि त्याशेजारी असणाऱ्या इमारतीमध्ये मागील तीन महिन्यांपासून विजेचा प्रॉब्लेम सुरु आहे. बिल्डींगच्या आणि बंगल्याच्या रहिवाशांनी याबाबत महावितरणाला तक्रारी दिल्या होत्या. मात्र त्याकडे महावितरण विभागाने कानाडोळा केला. येथील घरांच्या एसी, फ्रिज इत्यादी जास्त वीज लागणारी विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नव्हती, कित्येकांच्या घरातील विद्युत उपकरणेही बिघडली. मात्र महावितरणने वेळीच लक्ष न दिल्याने एसीला आग लागल्याचा घरच्यांचा आरोप आहे. या आगीत शाह कुटुंबियांच्या घराचे नुकसान झाले आहे. सुदैवानं ऐन दिवाळीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
वसई पूर्वेकडील वसई फाटा येथील एका चप्पल गोदामाला भीषण आग लागली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास ही आग लागली होती. वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाकडून तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, ७ टॅंकर, २ अधिकारी आणि १६ अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने ही आग विझवण्यात आली. आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र सामानाचे अतोनात नुकसान झाले.