टीम इंडियाचा दिवाळी धमाका

Share

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जात असतो. या खेळामध्ये कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. त्यामुळे सामन्यातील अंतिम षटक संपेपर्यंत अथवा समोरच्या संघातील शेवटचा खेळाडू बाद होईपर्यंत काहीही तर्क लावणे अवघड असते. त्यातच भारत आणि पाकिस्तानी संघातील क्रिकेटचा सामना म्हटल्यावर क्रिकेट रसिकांसाठी एक मेजवानीच असते. इतर दोन देशांतील सामने आणि भारत-पाक सामना यात गेल्या काही दशकांपासून जमीनआस्मानचा फरक राहिलेला आहे. वास्तविक पाहता भारत-पाक हे एकमेकांचे शेजारी. पण शेजारधर्म राहिला बाजूला, १९४७पासून पाकिस्तान सातत्याने भारतविरोधी कृत्य करत असल्याने, भारतविरोधी दहशतवादी कृत्याला खतपाणी घालत असल्याने या दोन देशांतील सुसंवाद कधीच संपुष्ठात आलेला आहे. पाकने १९४७, १९६५, १९७१ या तीन लढायांमध्ये भारताने पाकच्या नांग्या ठेचल्या. पराभूत होऊनही पाक सातत्याने भारतविरोधी गरळ ओकतच राहिला आहे. उघडपणे युद्ध जिंकणे शक्य नसल्याचे पाहून त्यांनी कधी बनावट नोटा छपाईच्या माध्यमातून अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला, तर कधी दहशतवादी कृत्यांना खतपाणी घालत भारताच्या कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा छुप्पा प्रयत्न केला.

देशातील वादाचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावर उमटू लागल्याने या दोन देशांतील सामने चुरशीचे होत गेले व यापुढेही होत राहणार. दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत भारतीय क्रीडाप्रेमींना खऱ्या अर्थांने विजयाची भेट दिली आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी एक-दोन खेळाडूंचा खेळ उंचावला तरी विजय आवाक्यात येतो. क्रिकेट सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत पारडे कधी या संघाकडे तर कधी त्या संघाकडे झुकत असते. १९८४ साली झालेल्या शारजा चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना भारताने जवळपास सामना जिंकल्यातच जमा होता. चौकार गेला असता तर सामना ‘टाय’ झाला असता. त्यामुळे सामना गमविण्याची भीती नव्हतीच. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना चेतन शर्मांने फुलटॉस चेंडू टाकला. समोर जावेद मियॉदादसारखा कसलेला फलदांज होता. जावेद मियॉदादने तो फुलटॉस सीमारेषेबाहेर फेकला. पंचांचा हात आकाशाच्या दिशेने उंचावले. पाकिस्तानात जल्लोष साजरा केला गेला. मैदानावर पाकिस्तानी खेळाडूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. पाकिस्तानीच खेळाडूच ते. गरळ ओकल्याशिवाय स्वस्थ कसे बसणार ते? क्रिकेटच्या मैदानावर जिंकतो तसेच आम्ही युद्धाच्या मैदानावरही एक दिवस जिंकल्याशिवाय राहणार नाही.

कालच्या टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करत दिवाळी उत्साहात साजरी करण्याची संधी भारतीय खेळाडूंमुळे मिळाली आहे. अर्थात रोहित शर्माच्या सेनेला हा विजय सहजासहजी मिळालेला नाही. अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रोहित सेनेतील विराट कोहली आणि हार्दिक पांड्या या शिलेदारांमुळे भारताला विजय मिळविता आला आहे. अवघ्या दहा धावांमध्ये भारताची लोकेश राहुल व कर्णधार रोहित शर्मा ही नावाजलेली सलामीची जोडी तंबूत परतली होती. व्यक्तिगत चार धावा काढून दोघेही सलामीवीर बाद झाले होते. खोलवर फलंदाजीचा भरणा असलेल्या भारतीय संघाला टेन्शन नव्हते. पण संघाची धावसंख्या २६ असताना भारताचा भरवशाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवही बाद झाला. अवघ्या १० चेंडूंत १५ धावा काढणाऱ्या सूर्यकुमारचा हारिस रौऊफच्या कल्पक गोलंदाजीमुळे अल्पावधीतच सूर्यास्त झाला. त्यापाठोपाठ डावखुऱ्या अक्षर पटेल अवघ्या दोन धावा काढून बाद झाल्याने भारतीय धावफलकावर ४ बाद ३३ धावा झळकत होत्या. आता मात्र भारतीय क्रीडा रसिकांच्या डोळ्यांपुढे पराभवाच्या भीतीचे काजवे चमकण्यास सुरुवात झाली होती; परंतु विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी जबाबदारीने खेळ केला व संघाची पडझड होणार नाही, याची काळजी घेतली. विराट कोहलीने ५३ चेंडूंत ८३ धावांची आतषबाजी केली. एका टोकाला कोहली स्फोटक फलंदाजी करत असताना विकेट सांभाळण्यासाठी मुळातच नसानसात स्फोटक खेळाचा भरणा असलेल्या हार्दिकने ३६ चेंडूंमध्ये ४० धावा काढत संयमी खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये विजयासाठी १६ धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. त्यापाठोपाठ दिनेश कार्तिकही हजेरी लावून परतला. वाईड, नो बॉल व फ्री हिट भारताच्या पथ्यावर पडली. विराटने षटकार-चौकारची आपली तोफ कायमच ठेवली. फ्री हिटवर त्रिफळा उडाल्यावर बाद नसल्याचे स्पष्ट झाल्याने पळून तीन धावांची कल्पकता व समयसूचकता कोहलीने दाखविली. आश्विनने विजयी चौकार लगावत सारे जहॉसे अच्छा हिंदोस्ता हमारा हे पाकिस्तानला दाखवून दिले. गमविलेला सामना भारताने कोहली व पांड्याच्या खेळामुळे जिंकला. भारतीय खेळाडूंचा उत्साह ओंसडून वाहिला. रोहित शर्माने तर मैदानावरच कोहलीला उचलून घेतले. प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. मैदानावर खेळाडूंचा व मैदानाबाहेर भारतीयांचा जल्लोष सुरू झाला. फटाक्यांची आतषबाजी वाढत गेली. भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य असलेल्या सुनील गावस्करांनाही वय वर्षं ७३ असल्याचा विसर पडला. इरफान, पठान व कृष्णमचारी यांनी श्रीकांतसोबत जल्लोष करत व उड्या मारताना जोरजोरात टाळ्या वाजवत भारताच्या विजयाचे सेलिब्रेशन केले.

Recent Posts

अतिरेक्यांशी झुंजताना दोन महिन्यांत सहा जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…

4 minutes ago

Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला दिलेल्या आमंत्रणावरून नीरज चोप्रा वादाच्या भोवऱ्यात

ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम बंगळुरू  : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी…

30 minutes ago

पहलगाम हल्ला प्रकरणातील एका अतिरेक्याचे घर स्फोटकांनी उडवले आणि दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…

1 hour ago

World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिन! पण मलेरियाचा शोध कुणी लावला?

आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…

2 hours ago

CSK vs SRH, IPL 2025: चेन्नई व हैदराबाद आमने सामने

मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…

2 hours ago

महारेरा ३६९९ प्रकल्पांच्या ‘ओसीं’ची सत्यता तपासणार!

मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…

3 hours ago