मेलबर्न (वृत्तसंस्था) : पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने रविंचंद्रन अश्विनचे आभार मानले आहेत. बीसीसीआयने एक व्हीडिओ जारी केला आहे. त्यात दिनेश कार्तिक आर. अश्विनचे आभार मानताना दिसत आहे.
बीसीसीआयच्या या व्हीडिओत दिनेश कार्तिक म्हणाला की, ‘काल मला वाचवल्याबद्दल तुझे आभार अश्विन. यावर अश्विन देखील हसताना दिसत आहे. जर भारताने हा सामना गमावला असता तर सर्वाधिक टीका ही दिनेश कार्तिकवर झाली असती. कारण दिनेश कार्तिकने मॅच फिनिशर म्हणून भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्यात दोन चेंडूंत दोन धावांची आवश्यकता असताना पायावर टाकलेल्या चेंडूला स्वीप करणे कार्तिकला जमले नाही. हा चेंडू स्टम्पजवळच राहिला होता. यष्टीरक्षक स्टम्पजवळ असल्याने धाव घेणे अशक्यच होते. पण तरीही धाव घेण्याच्या अशक्यप्राय प्रयत्नात कार्तिकने आपली विकेट गमावली.
कार्तिक बाद झाल्यानंतर भारताला एका चेंडूत २ धावांची आवश्यकता होती. नवा फलंदाज अश्विन स्ट्राईकवर होता. लेग साईडला टाकलेल्या एका चेंडूवर अश्विन शफल झाला. पंचांनी हा चेंडू वाईड म्हणून घोषित केला. भारताला विजयासाठी एका चेंडूत एका धावाची आवश्यकता होती. शेवटच्या चेंडूवर अश्विनने मीड ऑफच्या डोक्यावरून चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला. जर भारताने सामना गमावला असता तर सर्वाधिक टीका ही दिनेश कार्तिकवर झाली असती. त्यामुळेच कार्तिकने अश्विनचे आभार मानले.
या व्हीडिओत दिनेश कार्तिक आणि अश्विन यांच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या आणि विराट कोहली देखील संघाच्या बसमधून उतरताना दिसत आहेत. पंड्याने आपला मुलगा अगस्तला कडेवर घेतले होते. त्याच्यासोबत त्याची पत्नी नताशा देखील होती.