Friday, May 9, 2025

पालघर

फटाके फोडताना वेळमर्यादा पाळा अन्यथा कारवाई

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दिवाळी सणामध्ये वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांकरता वेळमर्यादा देण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.


दिवाळीच्या दिवशी फटाके हे रात्री ८ ते १० वाजेपर्यंत वाजवण्यास परवानगी देण्यात आलेली असून ख्रिसमस व नूतन वर्षाच्या स्वागताकरता मध्यरात्रीच्या सुमारास रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत फटाके वाजवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. कमी उत्सर्जन असलेले फटाके व केवळ हिरवे फटाके यांची निर्मिती व विक्री करण्यात यावी असे सांगण्यात आले असून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि घनकचऱ्याचा समस्या निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या निर्मिती व विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फटाक्यांमध्ये बेरियम क्षारांचा वापर करण्यास बंदी आहे. फटाक्यांच्या वापरामुळे होणारे हानिकारक परिणाम याची माहिती सर्वसामान्य जनतेस देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात देखील येणार आहेत.


फटाक्यांचे निर्मिती, वाहतूक, विक्री व वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची बंदी असून काही मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आल्या आहेत. फटाके वाजविण्याकरता वेळ देखील निश्चित करण्यात आलेली आहे. सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी आपापल्या हद्दीमध्ये फटाके विक्री करणाऱ्या स्टॉल धारकांकडून न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांची फटाके विक्रेते पूर्तता करत आहेत किंवा नाही याची व्यक्तिशः दखल घेऊन कार्यवाही करावी व फटाके निश्चित दिलेल्या वेळेतच वाजवले जातील याची खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आलेले आहे.


११ वाजेपर्यंत फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मीरा भाईंदर शहरात रात्री उशीरा पर्यंत मोठ्या प्रमाणात शहरात वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके वाजवण्यात येत होते. उशीर पर्यंत फटाके फोडणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याकरता विशेष पोलीस पथकाची नेमणूक पोलीस आयुक्त सदानंद दाते व उप आयुक्त विजयकांत सागर यांनी करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

Comments
Add Comment