Saturday, July 13, 2024
Homeदेशइटानगरमध्ये भीषण आग; ७००हून अधिक दुकाने भस्मसात

इटानगरमध्ये भीषण आग; ७००हून अधिक दुकाने भस्मसात

इटानगर (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमधील नाहरलागुनमध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ७००हून अधिक दुकाने जळून खाक झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दोन तासांत केवळ दोनच दुकानांना आग लागली होती. मात्र आगीचा फैलाव आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला अपयश आले. अरुणाचल प्रदेशातील ही सर्वात जुनी बाजारपेठ राजधानी इटानगरपासून सुमारे १४ किमी अंतरावर असून नाहरलागुनमधील पोलीस आणि अग्निशमन केंद्रांच्या जवळ आहे.

नाहरलगुन डेली मार्केटमध्ये मंगळवारी सकाळी ही भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास लागली. उशीरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. दिवाळीच्या मुहूर्तावर फटाके फोडल्याने किंवा दिवे पेटवल्याने ही आग लागल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळ गाठत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र बांबू आणि लाकडापासून बनवलेली दुकाने आणि बाजारात सुक्या मालाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने आग झपाट्याने पसरली. एलपीजी सिलिंडरच्या स्फोटानेही आगीत भर पडल्याचे पोलिसांनी सांगितले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यातील एक इटानगर येथून आली होती. आगीमुळे किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नसल्याचेही त्यांनी सांगितले. अग्निशमन विभागाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे नेमके कारण समजेल, असे इटानगरचे पोलीस अधीक्षक जिमी चिराम यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -