सीमा दाते
लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, नक्की तारीख ठरली नसली तरी शक्यता मात्र आहे. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांकडून आपल्या प्रचाराची देखील सुरुवात झाली आहे, ही दिवाळी सगळ्यांचा राजकीय प्रचारासाठीची दिवाळी ठरणार आहे. एकीकडे आधीच अंधेरी पेटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी भाजपने माघार घेतली असली तरी मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रचार सुरू आहे.
मात्र ही दिवाळी राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची ठरली आहे. कदाचित पालिका निवडणुकीच्या आधीची ही शेवटची निवडणूक असण्याची शक्यता आहे, गेल्या वर्षी देखील २०२१ ची दिवाळी ही राजकीय दिवाळी म्हणून साजरी झाली होती. कारण २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात महापालिका निवडणुका होणार होत्या. मात्र कोरोना आणि ओबीसी आरक्षणाच्या सगळ्यांमुळे ती निवणूक पुढे जात राहिली, त्या आधी पुन्हा एकदा राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. मात्र महापालिका निवडणुकांचा मुहूर्त काय अद्यापही सापडला नाही आहे. त्यानंतर निवडणूक २२७च्या प्रभाग रचनेनुसार होणार की, २३६ याचाच वाद अद्यापही सुरू आहे. मात्र असे असताना निवडणूक अजून पुढे न ढकलता लवकरच जाहीर करतील, अशी महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक महापालिका निवडणूक आधीची शेवटची आणि राजकीय निवडणूक ठरू शकेल आणि म्हणूनच या दिवाळीच्या मुहूर्तावर राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. विशेष म्हणजे आता नव्याने उदयाला आलेल्या दोन पक्षांकडून आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा हा प्रयत्न असणार आहे, अनेक ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने कसून मशालीचा प्रचार सुरू आहे. लोकांना कळावे की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चिन्ह मशाल आहे. यासाठी अनेक ठिकाणी उटण्याची पाकिटे वाटली जात आहेत. यावर मशालीचे चिन्ह, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंचा आणि आदित्य ठाकरेंचा फोटो वापरण्यात आला आहे, तर अनेक ठिकाणी कंदीलच्या माध्यमातूनही प्रचार सुरू आहे, तर शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेकडूनही अशाच प्रचार सुरू आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरण्यात येत आहे. खरं तर या दोन्ही पक्षाला आपली नवीन ओळख तयार करण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या आमदारांनीची संख्या मोठी असली तरी स्थानिक पातळीवर त्यांना आपल्या पक्षाची पक्षबांधणी करणे गरजेचे आहे. सध्या गेले चार वर्षे स्थायी समिती पद भूषविलेल्या यशवंत जाधव यांना उपनेते पद दिल्यानंतर भायखळा-माझगाव विभागात पक्ष बांधणीही जोरात केली आहे. इतकेच नव्हे तर युवा सेनेचे कार्यकर्तेही निवडले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवर आपण कसे टिकून राहू याकडे बघत आहेत. कारण येणारी महापालिका निवडणूक ही स्थानिक पातळीवर कोणाचे पारडे जड आहे हे ठरवणार.
यासाठी या दोन्हीही पक्षाला नवीन आव्हान आहे, येणारी महापालिका निवडणूक आणि विशेष म्हणजे २०२४च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपले हात मजबूत करावे लागणार आहेत. आता जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी बँड करून भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली असली तरी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढल्यानंतर आपली ताकद दिसणार आहे. त्यामुळे आतापासून आपला पक्ष बांधून ठेवणे गरजेचे आहे. राहिली गोष्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाही आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असली तरी पुढे असेच सोबत राहणार आहे का याबाबत शक्यता आहे. गेली कित्येक वर्षे ज्या काँग्रेसचा द्वेष केला त्या काँग्रेस सोबत सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केली. वैचारिक मतभेद असतानाही सत्तेसाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे दोन पक्ष आणि राष्ट्रवादी एकत्र आले. त्यामुळे पुढेही असेच विचार वेगवेगळे असणारे दोन्ही पक्षसोबत उद्धव ठाकरे शिवसेना यांची शिवसेना राहील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
त्यामुळे या दोन्हीही पक्षाकडे आपला पक्ष मजबूत करण्यासोबतच टिकवण्यासाठीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच दिवाळीचा मुहूर्त आणि सोबत प्रचाराची जोड सुरू आहे. बरं हे दोन पक्षच नाही तर इतर राजकीय पक्ष यात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी पार्क येथील दीपोत्सवही याला अपवाद आहे. बरं हा दीपोत्सव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात आला असाही नाही. कारण आज गेले कित्येक वर्षे जो दादरचा पत्ता म्हणजे सगळ्या मराठमोळ्यांचा पट्टा असलेल्या शिवाजी पार्कात दीपोत्सव साजरा होतो. मात्र यंदा या दीपोत्सवात वेगळेपण आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. त्यामुळे हा क्षण चर्चेचा देखील पडला आहे. या तिघांच्या एकत्र येण्याची समीकरणे पालिका निवडणुकीत देखील जुळणार असल्याची चर्चा सुरू आहे, तर वरळी-जांभोरी मैदान येथे भाजपचे दीपोत्सव, काही ठिकाणी दिवाळी पहाट असे अनेक कार्यक्रम सध्या पालिका प्रचाराची माध्यम ठरत आहेत हे नक्की.