मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरातील जंगल मंगल रोडवरील बारदान गल्लीत भीषण आग भडकल्याचे वृत्त आहे. साकीनाका पोलिस स्थानकाच्या अखत्यारीतील गोदामांना मंगळवारी सकाळी ही आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या आगीचे कारण मात्र अजून अस्पष्ट असून प्लास्टिक सामानाच्या गोदामांना ही आग लागल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या ७ गाड्या आणि ८ वॉटर टँकर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सकाळी साडा सहाच्या सुमारास ही आग लागल्याची घटना अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
ही लेवल-२ ची आग असल्याचे सांगण्यात येत असून या आगीमुळे अद्याप तरी कोणाला दुखापत झाल्याची किंवा कोणाचा मृत्यू माहिती समोर आलेली नाही. सकाळची वेळ असल्याने गोदामात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.