हैदराबाद : हैदराबादमध्ये फटाके फोडताना अपघात होऊन १० जण जखमी झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका लहान मुलाने डोळा गमावला.
येथील एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टर नजाबी बेगम यांनी सांगितले की, आमच्याकडे एकूण १० प्रकरणे आली आहेत, ज्यांना फटाके फोडताना इजा झाली. त्यामध्ये ४ जणांना गंभीर इजा झाली असून एका लहान मुलाने आपला डोळा गमावला आहे. इतर तिघांवर सर्जरी करण्यात येणार आहे. काल एकाच दिवसांत तिघांनी दवाखान्यात धाव घेतली होती, असेही डॉ. बेगम यांनी सांगितले.
दिवाळीचा सण फटाक्यांशिवाय साजरा केलाच जाऊ शकत नाही, अशी धारणा बनली आहे. त्यामुळेच, दिवाळीला फटाके उडवूनच पहिल्या अंघोळीची सुरूवात केली जाते. अभ्यंगस्नानाला, पाडव्याला, भाऊबीजेला फटाके उडवूनच दिवाळी साजरी होते. मात्र, दिवाळीचे फटाके उडवताना काळजी घ्यायला हवी. कारण, एकीकडे ध्वनी आणि वायू प्रदुषणामुळे दिवाळीच्या फटाक्यांवर बंदीची मागणी होत असते. तर दुसरीकडे फटाके फोडताना गंभीर दु:खापत होण्याचीही शक्यता असते.