उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील गोलमैदान परिसरातील हिरापन्ना इमारतीवर मध्यरात्री फटाक्यांचे रॉकेट सोडून दिवाळी साजरा करणाऱ्या एका अज्ञात माथेफिरू तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने इमारतीमध्ये रॉकेट सोडूनही कोणतीही अप्रिय घटना घडली नसून पोलीस माथेफिरू तरुणांचा शोध घेत आहेत.
रविवारी मध्यरात्री एका तरुणाने रॉकेटचा बॉक्स हातात धरून रॉकेट इमारतीच्या दिशेने सोडले. याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. रॉकेट इमारतीवर सोडल्याने, मोठी दुर्घटना घडली असती. परंतु सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र येथील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी सोशल मिडीयावर करण्यात आल्याने अखेर पोलिसांनी याप्रकरणी दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
हिरापन्ना इमारतीच्या दिशेने स्फोटक असलेले रॉकेट सोडून रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी या इमारतीमधील नवीन मुलतानी यांच्या तक्रारीवरून एका अनोळखी इसमाविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.