ढाका (वृत्तसंस्था) : ‘सितरंग’ चक्रीवादळाचा बांगलादेशला फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे बांगलादेशात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही धोका लक्षात घेता पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने बांगलादेशमध्ये सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाला.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बरगुना, नरेल, सिराजगंज आणि भोला बेट जिल्ह्यात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सितरंग चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. बांगलादेशातील सितरंग चक्रीवादळाचा वाढता धोका पाहता नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. सखल भागातून हजारो नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
सितरंग चक्रीवादळाची तीव्रती वाढली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम भारतातही दिसत आहे. कोलकाता आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकण्यास सुरुवात झाली आहे. हे चक्रीवादळ जमिनीकडे सरकल्यावर त्याची तीव्रता अजून वाढेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘सितरंग’ चक्रीवादळ मध्यरात्री २.३० वाजता बांगलादेशात ढाकापासून सुमारे ९० किमी ईशान्य, आगरतळापासून ६० किमी उत्तर-वायव्य दिशेला आहे. पुढील काही वेळांत हे चक्रीवादळ कमकुवत होण्याची शक्यता आहे.