मेलबर्न (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या लढतीत पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास हिरावल्यानंतर या सामन्यातील हिरो विराट कोहलीवर अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर कोहलीच्या कौतुकाचा महापूर आला आहे. जगभरातील आजी-माजी क्रिकेट खेळाडू, विविध क्षेत्रातील दिग्गजांसह चाहत्यांनी कोहलीच्या या अविस्मरणीय खेळीचे अभिनंदन केले आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या पाकिस्तानविरोधातील रोमांचक विजयानंतर सोशल मीडियात १६ तासांत कोट्यवधी पोस्ट टाकण्यात आल्या. प्रत्येक जण आपला आनंद व्यक्त करू इच्छित होता. क्रीडापटू असो, कलाकार असो किंवा चाहता सर्वांनी आपल्या भावना पोस्टमधून व्यक्त केल्या. राजकीय नेतेही यात मागे नव्हते. कोहलीच्या या खेळीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पोस्ट करत लिहिले आहे की, ‘विराट कोहली, निःसंशयपणे ही तुझ्या जीवनातील सर्वोत्तम खेळी आहे. तुला खेळताना पाहणे हा एक सुखद अनुभव होता. १९व्या षटकात रौफच्या चेंडूवर बॅकफूटवरून मारलेला षटकार दर्शनीय होता.
आयपीएलमधील विराट कोहलीचा सहकारी खेळाडू आणि मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळखला जाणारा एबी डिव्हिलिअर्सने लिहिले की, ‘विराट, माझ्या मित्रा, ते स्पेशल आणि इन्क्रेडिबल होते. बेस्ट ऑफ द बेस्ट’. सामन्यानंतर आयसीसीने किंग इज बॅक म्हणत कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘रिलॅक्स पडोसी इटस् ओन्ली अ मॅच’ असे म्हणत विरेंद्र सेहवागने कोहलीला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणाला की, ‘आजचा सामना नर्व्हस करणारा होता. आधी हा ९५ टक्के आमच्या बाजूने होता. पण विराट कोहलीने वर्ल्ड क्लास मॅच विनिंग खेळी केली. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या.
‘मेलबर्न मैदानावर रविवारी भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील आपल्या पहिल्या सामन्यात खेळत होते. महामुकाबल्याच्या सुरुवातीला भारतीय वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. मात्र, मधल्या फळीने पाकिस्तानची सामन्यात वापसी करत १५९ धावा केल्या. टीम इंडियाची सुरुवात पाहून असे वाटत होते की हा लो-स्कोअरिंग मॅच असेल. अशात १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. मेलबर्नच्या बाऊन्सर पिचवर शाहीन, नसीम आणि रौफच्या जोरदार गोलंदाजीला भारतीय फलंदाजीकडे कोणतेही उत्तर नव्हते. यामुळेच पॉवर प्लेमध्ये ३१ धावांवर ४ फलंदाज बाद असा धावफलक बघायला मिळाला. नंतर मात्र विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या सहाय्याने संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता.