Thursday, January 16, 2025
Homeताज्या घडामोडीनरेंद्र मोदी यांची कारगीलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी

नरेंद्र मोदी यांची कारगीलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जवान हेच माझे कुटुंबीय. यापेक्षा गोड दिवाळी असू शकत नाही. भारतीय सीमांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे सोमवारी कारगील येथे जाऊन देशाच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. येथे त्यांनी सैनिकांना संबोधित करताना ते बोलत होते.

आपल्यासाठी युद्ध हा कधीच पहिला पर्याय नाही. आपल्या वीरतेमुळे, संस्कारामुळे आपण युद्धाला नेहमीच शेवटचा पर्याय समजलेले आहे. लंका किंवा कुरुक्षेत्र असो, येथे आपण नेहमीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपण विश्वशांतीचे पुरस्कर्ते आहोत. आपण युद्धविरोधी आहोत. मात्र शांतता ही सामर्थ्याशिवाय शक्य नाही. आपल्या सैनिकांकडे सामर्थ्य आहे, रणनीती आहे. कोणी आपल्याकडे नजर वाकडी करून पाहण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या तिन्ही दलाचे सैन्य उत्तर देण्यास समर्थ आहे. शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास आपले सैन्य समर्थ आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

यावेळी मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था, विकास, सीमा सुरक्षा, भारताचे सामर्थ्य अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. दरम्यान, युद्ध आणि लष्करी सामर्थ्याबद्दल बोलताना आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. मात्र शांती ही सामर्थ्याशिवाय शक्य होत नाही. कोणी वाकडी नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय सैन्य त्यांना जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

सैनिकांच्या शौर्यासमोर आकाशदेखील झुकते. कारगिलचे क्षेत्र भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतीक आहे. शिखरावर बसलेला शत्रूदेखील भारतीय सेनेच्या साहसासमोर छोटा होतो. सैनिक सीमेचे रक्षक असून देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. तुम्ही देशाच्या सीमेवर आहात म्हणून देशातील लोक सुखात आहेत. देशाच्या सुरक्षेला पूर्णत्व देण्यासाठी आपला प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहेत. देशाची सीमा सुरक्षित असते, अर्थव्यवस्था सुदृढ असते आणि समाज आत्मविश्वासने ओतप्रोत असते तेव्हाच देश सुरक्षित असतो. देशाच्या ताकदीबद्दल ऐकल्यानंतर सैनिकांचेही मनोबल वाढत असेल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांची स्तुती केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दरवर्षी सीमेवरील भारतीय सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करत आहेत. २०१४ मध्ये त्यांनी सियाचीनमध्ये सैनिकांसोबत पहिली दिवाळी साजरी केली होती. तर २०१५ साली त्यांनी पंजाबमध्ये, २०१६ साली हिमाचलच्या किन्नौरमध्ये, २०१७ साली जम्मू-काश्मीर, २०१८ साली उत्तराखंड, २०१९ मध्ये राजौरी, २०२० मध्ये लोंगेवाला पोस्ट तर गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय सैनिकांबरोर दिवाळी साजरी केली होती. हीच परंपरा त्यांनी यंदाही कायम ठेवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -