Friday, July 11, 2025

नवी मुंबई परिवहनच्या सीएनजी बसमधून गॅस गळती

नवी मुंबई परिवहनच्या सीएनजी बसमधून गॅस गळती

कल्याण (प्रतिनिधी) : नवी मुंबई महानगरपालिका परिवहनच्या सीएनजी बसमधून अचानक गॅस गळती झाल्याचा प्रकार आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र सतर्क नागरिकांनी प्रसंगावधान राखून केलेल्या कामगिरीमुळे मोठी दुर्घटना टळली.


नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची ही सीएनजी बस नवी मुंबईहून कल्याणकडे येणारी बस होती. कल्याणच्या मेट्रो मॉल आणि पत्रीपुला दरम्यान ही बस चालली असताना त्याच्या सीएनजी टाकीमधून गॅस गळती होत असल्याचे काही नागरीकांच्या लक्षात आले.


त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. आणि बस चालक आणि वाहकाने लगेचच बस थांबवत सर्व प्रवाशांना खाली उतरवून स्वतःही बसच्या बाहेर आले. तोपर्यंत काही नागरिकांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत लगेचच ही गळती थांबवण्याच्या दृष्टीने उपाय योजना सुरू केल्या. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळेच मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा