Wednesday, March 26, 2025

काय घ्यावं?

प्रा. प्रतिभा सराफ

अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या प्राथमिक गरजा आहेत, असं आपण शालेय अभ्यासक्रमात शिकलो. पण अलीकडे त्यात तीन गरजांची भर पडली आहे – शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन!एकदा मनोरंजन म्हणून मी टीव्ही पाहत होते.

टीव्हीवर सिनेनट अनुपम खेर यांची मुलाखत चालू होती. अनुपम खेर यांना एक प्रश्न विचारण्यात आला की, या सिनेसृष्टीत तुम्ही कोणाकडून काही शिकलात का? अनुपम खेर यांनी याचे उत्तर दिले, एकदा शूटिंग चालू होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य आग ओकत होता. उघड्या मैदानात शूटिंग पूर्वी आम्ही बसलो होतो. मी आरडाओरडा करत होतो. ‘मला पंख्याने हवा घाला… माझ्या डोक्यावर मोठी छत्री धरा… मला कोल्ड्रिंक द्या… माझा मेकअप ठीक करा… मला हे… मला ते…’ सगळेजण माझ्या आसपास धावाधाव करत होते. इतक्यात माझे लक्ष जवळच बसलेल्या अमिताभ बच्चनकडे गेले. ते राजाच्या भूमिकेत होते. त्यामुळे त्यांनी अंगभर जाड अंगरखा घातला होता. डोक्यावर मुकुट होता. पायात जाड बूट होते. अंगभर वजनदार दागिने चढवलेले होते. मी मनात विचार केला, माझ्या अंगावर साधा कुर्ता आहे तर या उन्हाने माझ्या जीवाची लाही लाही होत आहे. मग अमिताभ बच्चनला किती गरम होत असेल. तरीही ते किती शांत बसून आहेत. त्या दिवशी मला स्वतःच्या वागण्याची लाज वाटली. मी नकळतपणे या माणसाकडून कितीतरी गोष्टी शिकलो. काम म्हणजेच परमेश्वर! त्यात तक्रार नसावी.

या मुलाखतीने जसे अनुपम खेर यांना काही शिकवले तसे त्या मुलाखतीने मलाही समृद्ध केले. केवळ मनोरंजन म्हणून आपण कधी कधी टीव्ही पाहतो, पण माहितीप्रद कार्यक्रम, थोरामोठ्यांच्या मुलाखती, जगभरातील बातम्या आणि कधी कधी तर अतिशय कलात्मक अशा जाहिराती या सगळ्या, आपल्या जगण्याला वेगळे आयाम देऊन जातात! त्यामुळे मनोरंजनातूनही नेमकं ‘काय घ्यावं?’ हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -