डॉ. सुकृत खांडेकर
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीला कमालीचे महत्त्व आले होते. भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केला आणि त्या क्षणापासून या निवडणुकीचा टीआरपी भसकन खाली आला. राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातल्या एका मतदारसंघात विधानसभेसाठी पोटनिवडणूक येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पण त्याला राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त झाले होते.
जून महिन्याच्या अखेरच्या दिवशी राज्यातील ठाकरे सरकार कोसळले आणि नंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांचे सरकार स्थापन झाले. सत्ता गमावल्यानंतर चार महिन्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अंधेरीमधील परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांत अशा काही पाठोपाठ घटना घडल्या की, ठाकरे सेनेची चोहोबाजूने कोंडी होऊ लागली. विधानसभेत पन्नास आमदारांनी उद्धव ठाकरेंचे समर्थन काढून घेतल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. एवढ्या मोठ्या संख्येने पक्षाचे आमदारच समर्थन काढून घेतात, असे महाराष्ट्रात प्रथमच घडले. भाजपने आपला तगडा उमेदवार मागे घेतल्यामुळे अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील चुरस केव्हाच संपली आहे. आता तर एकतर्फी निवडणूक होणार आहे. भाजपने माघार घेतली म्हणून भाजपने पलायन केले, असा बँड वाजवायला ठाकरे सेनेने सुरुवात केली. मतदानापूर्वीच आपला विजय झाला, अशा थाटात ठाकरे सेना भाजपवर दुगाण्या झाडत आहे व आपल्याला कोणी प्रतिस्पर्धीच नाही, म्हणून आनंदात आहे. पण निवडणुकीच्या मैदानातून माघार म्हणजे पलायन नव्हे, हे बेहोषात जल्लोष करणाऱ्यांना सांगणार कोण?
देशात किंवा राज्यात प्रत्येक निवडणूक भाजप लढवते. मग अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली यामागे निश्चित दीर्घकालीन कुटनीती आहे. गेल्या चार महिन्यांत ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद गमावले, महाआघाडीचे सरकार कोसळले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे सेना तीनही पक्षांचे प्रचंड नुकसान झाले. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव गोठवले आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक चिन्हही गोठवले. उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. एवढेच नव्हे, तर अंधेरी पोटनिवडणुकीत त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीचा मुंबई महापालिका नोकरीचा राजीनामा स्वीकारण्यास विलंब करीत आहे म्हणून पुन्हा उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. गेले चार महिने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला प्रत्येक आघाडीवर लढावे लागत आहे. त्यातून त्यांच्या पक्षाला जनतेत सहानुभूती वाढते आहे का व त्याचा लाभ अंधेरीच्या पोट निवडणुकीत त्यांना होईल का?, या चर्चेला उधाण आले होते.
दिवंगत लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्याच्या कुटुंबातील सदस्य कोणी उमेदवार असेल, तर निवडणूक बिनविरोध व्हावी, हा विचार स्तुत्य आहे. पण आजवर राज्यात झालेल्या प्रत्येक पोटनिवडणुकीत त्या विचाराचे पालन झाले आहे का? दिवंगत सदस्यांच्या वारसाला बिनविरोध निवडून द्यावे, अशी ठोस परंपरा नाही. तरीही भाजपने उदात्त विचार करून अंधेरीच्या पोटनिवडणुकीत राजकीय संस्कृती असे कारण देऊन माघार घेण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागत मनापासून सर्वांनी स्वागत करायला हवे होते. पण कमळाबाईने पळ काढला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्या मनाचा संकुचितपणा काहींनी दाखवून दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपचा उमेदवार मागे घेण्याचे आवाहन केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनाही हीच मागणी केली होती. रमेश लटके यांचे १० मे रोजी निधन झाले. ३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पत्नी ऋतुजा यांनी महापालिका नोकरीचा राजीनामा दिला. ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढवत आहेत. मुळात भाजपने ही पोटनिवडणूक लढविण्याचे का ठरवले, तर मुरजी पटेल यांचा उमेदवारी दाखल करताना पंधरा हजारांहून अधिक समर्थक मिरवणुकीने गेले होते. कृपाशंकर सिंह यांनी मतदारसंघातील उत्तर भारतीय भाजपच्या पाठीशी उभे राहतील, असा ठाम विश्वास प्रकट केला होता. गेल्या निवडणुकीत पटेल यांना ४५ हजारांपेक्षा जास्त मतदान झाले होते. मग राज ठाकरे यांच्या पत्रानंतर लगेचच पोटनिवडणुकीत माघार घ्यावी हे भाजपला कसे काय सुचावे? मुरजी पटेल यांची उमेदवारी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी जाहीर केली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माघारीचा निर्णय नागपूरमधून घोषित केला, हे गौडबंगाल काय आहे, याची उत्तरे सामान्य जनतेला मिळालेली नाहीत.
अंधेरीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पंचेचाळीस हजार मतांनी पराभव झाला असता, असे पाहणी अंदाज सोशल मीडियावरून फिरत होते. पण त्याची विश्वासार्हता कितपत आहे? एका पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजपने माघार घेतली, असा नित्कर्ष काढणे चुकीचे म्हणावे लागेल. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही या वर्षी झालेल्या राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पाडून भाजपने आपल्याकडे जास्त यश मिळवून दाखवले हे कसे विसरता येईल?
नुकत्याच झालेल्या पंचायतीच्या निवडणुकीत भाजपने ग्रामीण भागात सर्वाधिक यश मिळवले याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? शिवसेनेचे समर्थक पन्नास आमदार व बारा खासदार बाहेर पडल्याच्या ऑपरेशनमध्ये भाजपचे राजकीय कौशल्य कसे नाकारता येईल? तरीही अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून भाजपने पळ काढला, असे म्हणणारे वास्तवतेचे भान विसरले आहेत, असेच म्हणावे लागेल.
कोल्हापुरात आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्याविरोधात भाजपने निवडणूक लढवली होतीच. नांदेड-देगलूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या दिवंगत आमदाराच्या मुलाच्या विरोधातही भाजपने मैदानात उमेदवार उतरवला होताच. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यावर त्याच्या मुलाने निवडणूक लढवली. पण भाजपने त्यांच्याविरोधात समाधान औताडे यांना उमेदवारी देऊन निवडणूक जिंकली होती. अंधेरीला जो कोणी निवडून येईल, त्याला जेमतेम दीड वर्षे आमदारकीची टर्म मिळेल. नंतर २०२४ मध्ये निवडणूक होणारच आहे. मग दीड वर्षासाठी का निवडणूक लढवावी, असाही विचार फडणवीस – बावनकुळे यांनी केला असावा. दोन पावले पुढे जायचे असले, तर एक पाऊल मागे यायचे हा एक रणनीतीचा भाग असू शकतो.
राज ठाकरे यांनी फडणवीसांना पत्र लिहिले हे निमित्त ठरले की, नियोजनाचा भाग होता, हे त्या दोघांनाच ठाऊक. पण मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचे पुण्यात निधन झाले, तेव्हा खडकवासला मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पत्नी हर्षदा यांना उमेदवारी दिली होती. पण त्या निवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर विजयी झाले होते. तेव्हा कोणी राजकीय संस्कृतीचा मुद्दा मांडला नव्हता.
मातोश्रीच्या परिसरात असलेल्या खेरवाडी मतदारसंघातून आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. पण नंतर त्यांची शिवसेनेत जी उपेक्षा झाली, त्याला कंटाळून यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना मुंबईचे उपाध्यक्षपद देऊन सन्मान केला.
अंधेरीच्या पोटनिवडणुकीवर बीसीसीआय व एमसीए या क्रिकेट संघटनाच्या निवडणुकीची छाया होती, असे एक कारण पुढे आले आहे. बीसीसीआय व एमसीए यांची निवडणूक राजकीय व आर्थिकदृष्ट्या मोठी प्रतिष्ठेची आहे. पक्षीय राजकारण दूर ठेऊन ही निवडणूक लढवली जाते. आशीष शेलार हे बीसीसीआयचे खजिनदार म्हणून निवडून आले आहेत. एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार, जितेंद्र आव्हाड हे सर्व दिग्गज एकाच मंचावर आलेले दिसले. दि. १४ ऑक्टोबरला मुरजी पटेल यांनी अंधेरीत उमेदवारी अर्ज वाजत-गाजत प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत भरला व दि. १७ ऑक्टोबरला माघार घेतली, यामागे केंद्रात व देशात बारा राज्यांत सत्तेवर असलेल्या भाजपने मुंबई महापालिका डोळ्यांपुढे ठेवून मोठा डाव खेळला आहे. ऋतुजा लटके यांचा विजय झाला तरी भाजपशी लढून जिंकल्याचा आनंद ठाकरेसेनेला मिळणार नाही.