अनुराधा परब
अंधारावर प्रकाशाने, अज्ञानावर ज्ञानाने, असत्यावर सत्याने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवाचं कोकणातलं रूप शहराच्या मानाने विशुद्ध असतं. तेजाच्या या प्रकाशपर्वाची – प्रत्येक दिवसाची एक कथा आहे. कथा एकसारख्या असल्या तरीही प्रदेशागणिक त्यानुसार आखलेल्या परंपरांचा बाज वेगवेगळा आहे. वसुबारसपूर्वी येणारी कराष्टमी हा नवरात्रीनंतर येणारा मातृशक्तीच्या पूजनाचा आणखी एक दिवस. करा म्हणजे मातीचा लहान कुंभ. प्राचीन भारतीय संस्कृतीत कुंभाला सृजनाचे, मातृगर्भाचे प्रतीक मानले गेले आहे.
आश्विन कृष्ण अष्टमीला होणारी (आठवीची पूजा) कुंभांची पूजा सर्जन, समृद्धी आणि चैतन्याचे स्वरूप मानली जाते. आश्विन आणि कार्तिक हे दोन्ही मराठी महिने शक्तिपूजनाच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जातात. आश्विनात देवीचे नवरात्र दसरा, द्वादशीसोहळा सिंधुदुर्गातल्या जातीजमातींमध्ये जसा वैशिष्ट्यपूर्ण असतो तसेच आश्विन कार्तिकाच्या सीमेवरील दिवाळीसुद्धा वेगळी असते. आश्विन महिन्यातल्या कोजागिरीला – नवान्नपौर्णिमेला लक्ष्मी आणि इंद्राची पूजा केली जाते. या उत्सवादिवशी नवधान्याची खीर, विविध पदार्थ करण्याची, दारावर नवधान्याच्या लोंब्या लावण्याची परंपरा हे कृषी संस्कृतीच्या सन्मानाचंच प्रतीक आहे. दिवाळी ऋतूनुसार आहारातही बदल घेऊन येते. आहारात स्निग्धता, पौष्टिकता देणाऱ्या पदार्थांबरोबरच कडूनिंब, कारेट्यासारख्या वनस्पतींच्या सेवनातून रोगमुक्तीचाही विचार दिसतो. लक्ष्मीपूजनावेळी दाखवला जाणारा धणेगुळाचा नैवेद्यही औषधी आहे. कोकणातील प्रमुख अन्न भात असल्याने साहजिकच बऱ्याचशा पाककृती, पदार्थांत भाताचा वापर होणं ओघानं आलंच. आश्विन कृष्ण त्रयोदशीला घरी आलेल्या नवीन धान्याची पूजा करण्याची जशी पद्धत आहे तशीच त्यादिवशी धन्वंतरीची पूजाही करण्याची रित आहे.
समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या धन्वंतरीची कथा तर सर्वश्रुतच आहे. या दोन्ही परंपरा मानवी जगण्याला समृद्धतेबरोबरच सदृढता देण्याला हातभार लावणाऱ्या आहेत. घरचं धन म्हणजे नवीन धान्य, शेतीला उपयोगी पडणारी गाईगुरं तसंच धान्य विकून आलेली लक्ष्मी (पैसा) यांचा यथोचित आदर करण्याचा, त्यांचे ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यानंतर चावदिसादिवशी म्हणजे नरकचतुर्दशीला पारंपरिक फराळ होतो. सिंधुदुर्गात दिवाळीला घरीच कांडलेल्या पोह्यांचे नानाविध प्रकार तयार केले जातात. यात गोडपोहे, गूळपोहे, दूधपोहे, तिखटपोहे, बटाटापोहे असे एक ना अनेक प्रकार आप्तपरिवारासह खाल्ले जातात. यासोबत काही ठिकाणी काळ्या वाटाण्याची उसळही तोंडीलावणीला असतेच. आदल्या रात्री नवा भात भिजत घालून दुसऱ्या दिवशी चुलीवरच्या मडक्यात भाजून नंतर व्हायनात (लाकडी उखळ) मुसळीने कांडला जातो. सिंधुदुर्गात पूर्वी घरोघरी भात कांडला जात असे. या कांडपण्याच्या वेळी आयाबाया ओव्या गात असत. नरकासुराच्या वधाची कथा सुपरिचित असली तरी या दिवशी यमदीपदान केल्याने मानवाला मृत्यूपासून सुरक्षा आणि नरकयातनांतून सुटका मिळते, असा एक समज प्रचलित आहे. त्याकरिता एक तरी दिवा हा यमाच्या नावे लावण्याची रित आहे. कृष्णाने सत्यभामेच्या मदतीने अत्याचारी नरकासुराचा वध केला आणि सर्व जगाला भयमुक्त केले. या वधाचे प्रतीक म्हणून चावदिसाच्या पहाटे अंघोळीनंतर कोकणात तुळशीवृंदावनासमोर कारेटं फोडण्याची परंपरा आहे. कारेटं फोडताना ‘गोविंदा गोविंदा’ अशी आरोळीही ठोकली जाते. पापाचा नाश आणि पुण्याच्या प्रकाश पसरविणाऱ्या या दिवसाचे महत्त्व काही वेगळेच आहे. हेमंत ऋतूचा प्रारंभ होत असताना शरीराला येणारा कोरडेपणा घालविण्यासाठी दिवाळीत पहाट अंघोळीला तेल, उटणे लावण्याची परंपरा आहे. उटण्यातील विविध औषधी त्वचेची निगा राखतात, तर तेलामुळे आवश्यक तेवढा स्निग्धांश बाह्यरूपाने मिळाल्याने रोगराईपासून संरक्षण मिळते, अशी त्यामागील आरोग्यविषयी धारणा आहे. किंबहुना, दिवाळीपासून आहारामध्ये तिळाचा समावेश व्हायला सुरुवात होते.
जैन समाजामध्ये दिवाळी मोक्षपर्व म्हणून साजरी होते. दिवाळीच्या अमावस्येला जैनांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचे निर्वाण झाले. मोक्षपदाला जाण्यापूर्वी भगवान महावीरांनी दिवाळीच्या दिवशी सर्व शिष्यांना उपदेश केला. जैन ग्रंथांच्या मते त्याला “उत्तराध्ययन सूत्र” म्हणतात. भगवान महावीरांना त्यांच्या असीम त्याग आणि तपस्येमुळे मोक्ष मिळाल्याने त्यांचा निर्वाणोत्सव जैनांसाठी विशेष आहे. म्हणूनच त्याला मोक्षपर्व मानून दीपोत्सव साजरा केला जातो.
नव्या विक्रमसंवत्सराचा दिवस अर्थात कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. कोकणात पशुधन अन्य प्रदेशांपेक्षा तुलनेने कमी असले तरीही शेतीसाठी या गाईगुरांचं योगदान लक्षात ठेवून त्यांचा सन्मान करण्याचा दिवस. जनावरांची शिंगं रंगवणं, त्यांना गोडाचं खाऊ घालणं हे तर कोकणाव्यतिरिक्त इतर ठिकाणीही होतं. मात्र कोकणात याच जनावरांचा शेणाचा प्रतिकात्मक गोठा घराच्या परसदारी करून, सजवून त्यात हिराच्या (खराट्याच्या) काड्यांना कारेटे टोचून त्याला गोपाल-कृष्ण म्हणून पूजलं जातं. त्याला दह्याचा नैवेद्य दाखवला जातो. आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याचं सांबारं तर जेवणात हमखास असणारच. नंतर येणारी यमद्वितीया म्हणजे भावाबहिणीच्या नात्याला साजरं करण्याचा खास दिवस. या दिवसाची कोणत्याही प्रदेशातली बहीण, माहेरवाशीण वर्षभर आतुरतेने वाट पाहते.
सिंधुदुर्गातल्या ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या घरचा दिवाळी फराळ म्हणजे “तांदळाची बोरं”. भातकापणीचे दिवस म्हणजे कमाईचे दिवस. साहजिकच शेतात काम करणाऱ्या स्त्रियांची लगबग जाणूनच हा पदार्थ तयार झालेला असावा. तांदूळ, गूळ, तीळ आणि किसलेला नारळ या मोजक्या जिन्नसांनी तयार होणारी “गोड बोरं” कष्टकऱ्यांच्या दिवाळीचा गोडवा सर्वार्थाने वाढवणारी आहेत. याशिवाय भाजक्या चण्याच्या सारणाची खुसखुशीत करंजी हा पदार्थदेखील वेगळा आहे.
देवदिवाळीपूर्वी साजरी केली जाणारी ही छोटी दिवाळी जगण्यातल्या अंधाराला प्रकाशाचा, आशा – उमेदीचा मार्ग दाखवते, निराशेला तेजाने उजळते आणि घराघराच्या कानाकोपऱ्यांतच नाही तर मनाच्या तळाशीही नव्या उत्साहाचा प्रकाश छोट्याशा पणतीने भरून टाकतो. घरातल्या मिणमिणत्या पणतीचाही अंधारात आधार वाटावा, अशी आश्वासकता हाच प्रकाश देतो. मंदिरातील पणत्यांनी लखलखणाऱ्या दीपमाळा या आश्वासकतेला श्रद्धेची, विश्वासाची जोड देतात. माणसाला अत्त दीप भव। अर्थात स्वयंप्रकाशी होण्याची प्रेरणा देणारं हे प्रकाशपर्व मानवी जगण्याला नवी उभारी देतं.
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…
मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…
मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…