दीपक परब
माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या चिमुकल्या परीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. आता ती एका शॉर्ट फिल्ममध्ये देखील झळकते आहे. मोबाइल पोल्युशनवर एक अतिशय समर्पक असणारी अशी काळजाचा ठाव घेणारी शॉर्टफिल्म गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या शॉर्टफिल्मचे प्रमुख आकर्षण आहे तीची कन्सेप्ट आणि बालकलाकार मायरा वायकुळ. मायराची ही शॉर्टफिल्म अनेकांपर्यंत पोहोचावी म्हणून तिची निर्मिती मराठी, हिंदी आणि कन्नड अशा तीन भाषांमध्ये करण्यात आली आहे. विविध व्हीडिओंच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणारी, लहान वयातच सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी चिमुरडी मायरा वायकुळ आता मोबाइल पोल्युशनवर मेसेज देण्यासाठी सज्ज झाली आहे. मोबाइलमुळे जग जवळ आले असले तरी, नात्यांमधला जिव्हाळा कुठेतरी हरवत चालला आहे. त्यामुळे ‘सतर्क व्हा’ असा इशारा करणारी ही फिल्म अगदी रोजच्या आयुष्यात घडणारा एक प्रसंग बोलक्या स्वरूपात घेऊन आली आहे. छोट्या अनूच्या (मायरा वायकुळ) पाचव्या वाढदिवसाचं जंगी आयोजन केले जाते. पण वाढदिवसाच्या दिवशी हजर असलेले नातेवाईक मोबाइलमध्ये व्यस्त असतात. एकमेकांच्या समोर असूनसुद्धा मोबाइलच्या माध्यमातून कनेक्ट होतात. जेव्हा केक कापण्याची वेळ येते, तेव्हा तर सगळे मोबाइलला समोर धरून तो सोहळा शूट करतात. मात्र अनूला हे काही नकोय.. तिला मोबाइलच्या माध्यमातून नात्यांशी जोडायचे नाही; तर माणसांच्या सहवासातून नात्यांच्या घट्ट बंधनात गुंफायचे आहे. तिला मोठ्ठा केक नको, मोठाले गिफ्ट नकोत, तर तिला हवाय आपल्या लोकांचा ‘वेळ’. या वेळेतूनच तिला हरवत चाललेली नाती जोडायची आहेत. तिला नात्यांमधला जीवंतपणा निर्माण करायचा आहे. यावेळी ती एक महत्त्वाचा संदेश देऊन जाते. अद्भुत क्रिएटिव्हज आणि मायरा या दोघांनी आमच्या संकल्पनेला समाधानकारक स्वरूप दिल्याचे निर्माते कौशिक मराठे म्हणाले.
‘ज्ञानेश्वर माऊली’त नामदेवांच्या भूमिकेत अवधूत गांधी
ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माऊली आणि त्यांची भावंडे यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूपदर्शन, पसायदान हे सारे काही प्रेक्षकांना विशेष भावले. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका संताचा प्रवेश होणार आहे. संतांच्या या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली. संत चोखामेळा यांची कथाही प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना ती भावली आहे. आता मालिकेत संत नामदेव यांचा प्रवेश होणार आहे. माऊली आणि नामदेव यांची भेट कशा प्रकारे होणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. संत नामदेव यांची भूमिका अवधूत गांधी साकारणार आहेत. अवधूत गांधी हे वारकरी संप्रदायातले नावाजलेले व्यक्तिमत्त्व. ते ज्ञानेश्वर माऊली मालिकेच्या सुरुवातीपासूनच सहभागी आहेत. याविषयी त्यांचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. त्यांच्या या वेशाची / पेहेरावाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होईल, यात शंकाच नाही. त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊली यांची भेट कशी होते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढवणारे असेल.
अभिनेत्री वैशाली मृत्यूनंतरही पाहू शकणार जग…
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने १६ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आणि संपूर्ण टेलिव्हिजन विश्व हादरले. ती इंदौरमध्ये राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. दरम्यान या ठिकाणाहून पोलिसांनी डायरी आणि एक नोट जप्त केली आहे. यामध्ये तिने राहुल नवलानी आणि त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केलेत. राहुल आणि त्याची पत्नी दिशा हिने गेल्या दोन वर्षांपासून तिला त्रास दिल्याचे वैशालीने या चिठ्ठीत नमूद केले. त्यामुळेच अभिनेत्रीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे तिने या पत्रात लिहिले होते. वैशाली ठक्कर मृत्यू प्रकरणात अशी माहिती समोर आली आहे की, तिच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारापूर्वी तिचे डोळे दान केले आहेत. वैशालीच्या बहिणीने सांगितले की, ‘वैशालीला तिचे डोळे खूप आवडत होते आणि ती मृत्यूनंतर तिचे डोळे दान करणार असल्याचेही सांगायची. याबाबत तिने तिच्या आईलाही सांगितले होते. वैशालीच्या बहिणीने अशी माहिती दिली की, तिचे डोळे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑथॉरिटीजना १६ ऑक्टोबर रोजी दान करण्यात आले, ज्याद्वारे एखाद्याला हे जग पाहता येईल. वैशालीने ‘ससुराल सिमर का’मध्ये अंजली भारद्वाजची भूमिका साकारली होती. याशिवाय ती ‘सुपर सिस्टर्स’मध्ये शिवानी शर्मा, ‘विश या अमृत : सितारा’मध्ये नेत्रा सिंह राठोड आणि ‘मनमोहिनी २’ मध्ये अनन्या मिश्राच्या भूमिकेत दिसलेली. वैशालीने स्टार प्लसवरील लोकप्रिय टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’मधून पदार्पण केले. गेल्या वर्षी ती दंगल टीव्हीच्या एका शोमध्येही दिसली होती.