Thursday, April 24, 2025
Homeक्रीडाविराट विजयाचे फुटले फटाके; हार्दिक पंड्याची अष्टपैलू खेळी

विराट विजयाचे फुटले फटाके; हार्दिक पंड्याची अष्टपैलू खेळी

मेलबर्न (वृत्तसंस्था) : विराट कोहलीचा झंझावात आणि त्याला मिळालेली हार्दिक पंड्याची साथ या बळावर शेवटच्या चेंडूपर्यंत दोलायमान स्थितीत रंगलेल्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवला. या विजयामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात भारताने दणक्यात केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सलामीचा सामना जिंकताच देशभरात भारताच्या विजयाचा जल्लोष फटाके फोडून करण्यात आला.

स्वींगचे संकट आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यातील सलामीच्या लढतीचा दबाव यामुळे या सामन्याला वेगळाच रंग चढला होता. वेगवान गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्ट्यांवर तगड्या गोलंदाजांचा भरणा असलेल्या प्रतिस्पर्धीं पाकविरोधात १६० धावांचा पाठलाग करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. अपेक्षेप्रमाणे सुरुवातीलाच भारताची घसरगुंडी झाली. अवघ्या ३१ धावांवर लोकेश राहुल, कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव या बिनीच्या शिलेदारांसह अक्षर पटेल हे चार फलंदाज तंबूत परतले होते. सहा षटकांत भारताच्या अवघ्या ३० धावा झाल्या होत्या. विराट कोहली आणि हार्दिक पंड्या या जोडीवर धावांचा वेग वाढविण्यासह सामना जिंकवण्याची अवघड अशी जबाबदारी पडली. सुरुवात खराब झाल्याने भारत बॅकफुटवर गेला होता.

अशा परिस्थितीत विराट कोहली भारतासाठी संकटमोचन ठरला. सुरुवातीला विराटने विकेट वाचविण्यावर भर दिला. त्याला पंड्यानेही चांगली साथ दिली. सेट झाल्यावर मग धावांची गती वाढविण्याला प्राधान्य दिले. विराट कोहलीने ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५३ चेंडूंत नाबाद ८२ धावा तडकावल्या. त्याला पंड्याच्या ४० धावांची साथ मिळाली. क्षणाक्षणाला सामना वळण घेत होता. शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी १ धावाची आवश्यकता होती. रवीचंद्रन अश्वीनने चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्याच्या सुरुवातीला भारतीय फलंदाजांना शांत ठेवणाऱ्या शाहिन शाह आफ्रिदी, हरिस रौफ यांना डेथ ओव्हर्समध्ये विराटने चांगलेच तुडवले. त्यामुळे सुरुवातीला घातक वाटणारे हे गोलंदाज नंतर मात्रा थंड पडले.

तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकून भारताने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी खेळपट्टी, वातावरण यांचा अचूक वापर करत आपल्या स्वींगने पाकिस्तानच्या फलंदाजांना वेडे केले. भुवनेश्वरने पहिल्या षटकात आऊट स्विंगने पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला धडकी भरवली. तीच लय अर्शदीप सिंगनेही कायम ठेवत संघाच्या दुसऱ्या आणि वैयक्तिक अशा पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर इन स्विंगवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला पायचीत केले. संघाच्या चौथ्या षटकात उसळत्या चेंडूवर अर्शदिपने रिझवानला झेलबाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. दोन्ही तगडे सलामीवीर माघारी परतल्यानंतर पाकिस्तानचा संघ दबावाखाली आला. शान मसूदही सापळ्यात अडकलाच होता, पण विराटने धावबाद करण्याची संधी सोडली आणि पाकच्या जीवात जीव आला. शान मसूद आणि इफ्तिकार अहमद यांनी पाकिस्तानला सावरले. दोघांनीही आपले वैयक्तिक अर्धशतक झळकावत पाकिस्तानला २० षटकांत १५९ धावा जमवून दिल्या. भारताच्या अर्शदीप आणि हार्दिक पंड्या यांनी प्रभावी गोलंदाजी केली. दोघांनीही ३ फलंदाजांना माघारी धाडले. भुवनेश्वरने ४ षटकांत २२ धावा देत १ बळी मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -