Share

सतीश पाटणकर

कोकणातील दिवाळी अजून तरी आगळी-वेगळी अशीच आहे. दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, अशी परंपरा आणि संस्कृतीची दीपमाळ आपण वर्षानुवर्षे जपत आलो आहोत. लहानपणापासून थोरपणापर्यंत प्रत्येकाच्या मनात असलेला दिवाळीचा उत्साह वेगवेगळा आहे. फराळ, फटाके, नवनवीन कपडे, बहीण-भावाच्या नात्याची भाऊबीज, लक्ष्मीपूजन, पाडवा असे चार दिवसांच्या दिवाळीत उत्सवाचे आणि उत्साहाचे नाना रंग आपलं मन प्रफुल्लित करीत आले आहेत.  ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत. दीपावली म्हणजे दिव्यांच्या ओळी.

कोकणातील देवळादेवळांतून होणारा दीपोत्सव ही एक वेगळीच अनुभूती असते.गावागावातील देवळांसमोर असलेले दीपस्तंभ दिव्यांनी उजळून निघालेले असतात. पूर्वी या दीपस्तंभांवर पणत्या ठेवल्या जात. आताच्या आधुनिक काळात मात्र विजेच्या तोरणांना अधिक पसंती दिली जाते. घरांसमोरच्या अंगणात आकाशकंदिलांचा झगमगाट फारसा नसला तरी अजूनही बांबूच्या कामट्यांपासून ‘पारंपरिक पद्धती’चा आकाशकंदील बनविणे व तो अधिकाधिक उंचीवर टांगणे ही मजा आजही टिकून आहे. सध्या ‘रेडिमेड’ आकाशकंदिलांचा जमाना असला, तरी ग्रामीण भागात ‘पारंपरिक पद्धती’च्या आकाशकंदिलांना अजूनही प्राधान्य दिले जाते.

दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी. याला कोकणात अनेक ठिकाणी ‘धनतेरस’ असेही म्हटले जाते. पूर्वी या दिवशी छोटे किल्ले तयार करण्याची प्रथा होती. त्यासाठी शिवाजी व मावळ्यांच्या छोट्या-छोट्या मूर्ती तयार केल्या जात. या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. एखाद्या ताम्हणात, वाटीत किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो. ही परंपरा व्यापारीवर्गाने टिकवून ठेवली आहे. सर्वसामान्य माणूस त्याकडे फारसे लक्ष देत नाही. याच धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी पूजनही करण्याची परंपरा आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये या परंपरेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. धन्वंतरी पूजनच्या निमित्ताने कडुनिंबाची पाने खाण्याची किंवा ‘सात्त्विन’ वृक्षाच्या सालीचा रस प्राशन करण्याची प्रथा आहे. ती अजूनही बऱ्याच ठिकाणी पाळली जात आहे.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी, दिवसाची सुरुवात आपल्याकडे अभ्यंगस्नानाने होते. पण कोकणात मात्र आजही अनेक गावांत नारळाच्या रसाने स्नान करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसांत त्वचा रुक्ष पडते, त्वचेचा रुक्षपणा घालवण्यासाठी नारळाचं दूध वापरून स्नान केलं जातं. दिवाळीला घराला रंगरंगोटी करण्याची किंवा दाराभोवती मोठी रांगोळी काढण्याची पद्धत नसली तरी दारातल्या तुळशीभोवती शेण सारवून चुन्याची किंवा पिठाची रांगोळी काढली जाते. पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान झाल्यावर कोकणात घराघरांच्या समोर “गोविंदा ऽऽ गोविंदा”ची आरोळी ऐकू येते. अंगणातील तुळशी वृंदावनासमोरची जागा शेणाने सारवून घेऊन, त्यावर कडू चव असणारे ‘कारीट’ ठेवून ते डाव्या आंगठ्याने फोडले जाते. याचवेळी जोरजोरात “गोविंदा ऽऽ गोविंदा” ही आरोळी अख्ख्या वाडीत घुमली पाहिजे, अशीही अपेक्षा असते. ही परंपरा अजूनही एक गंमत म्हणून सुरू आहे. कारीट हे नरकासुराचं प्रतीक आहे. त्यामुळे वाईट प्रवृत्ती पायदळी तुडवून चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद घेतला जातो. कोकणात अनेक गावात सातीवनाचं झाडं असतं, या झाडाला नरकचतुर्दशीच्या दिवशी फार महत्त्व असतं. दिवाळीची सुरुवात तोंड गोड करून करायची असली तरी कोकणात मात्र शब्दश: तोंड कडू करून दिवाळीची सुरुवात करतात. गावातील एक व्यक्ती पहाटे लवकर उठून या झाडापाशी जाते. सातीवनाची पूजा केल्यानंतर या झाडाच्या साली काढून त्या घरी आणल्या जातात. त्यानंतर आजूबाजूंच्या घरात वाटल्या जातात. या सालीत मिरे, लसूण टाकून त्याचा रस तयार केला जातो, त्यानंतर घरातली इतर मंडळी या रसाचे प्राशन करतात. त्यात औषधी गुणधर्म असतात.

कोकणात या काळात भात कापणीची कामं सुरू असतात. कोकणातील बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह हा भात शेतीवर असल्याने या काळात सगळेच कापणीच्या कामात व्यग्र असतात. भाताची कापणी झाल्यानंतर पहिल्या कापणीतल्या भातापासून पोहे तयार केले जातात. आपल्या शहरी भागात मिळणाऱ्या पोह्यांपेक्षा हे पोहे खूपच वेगळे असतात. तपकिरी आणि जाडसर पोह्यात गूळ, खोबरं आणि वेलची घालून गोडाचे पोहे तयार केले जातात. हंगामातले पहिलेच पोहे असल्याने सारं कुटुंब देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर या पोह्यांवर ताव मारतं. झटपट दिवाळीचा बेत आवरल्यानंतर सारे पुन्हा भातकापणीच्या कामाला सुरुवात करतात. दक्षिण कोकणात नरक चतुर्दशी या दिवसाला ‘चावदिस’ असेही म्हटलं जातं. या दिवशी कोकणात सकाळी फराळ करताना त्यात नेहमीच्या पदार्थांना नगण्य स्थान असतं. या दिवशी महत्त्व दिलं जातं ते घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या पोह्यांना. त्यातही हे पोहे अगदी पारंपरिक पद्धतीने केले असतील, तर त्याची चव न्यारी असते.

या दिवशी शेजाऱ्यांना तसेच नातेवाइकांना पोहे खायला येण्याचे निमंत्रण दिले जाते. वाडीवाडीत एकमेकांच्या घरी पोहे खाण्यासाठी लोक जातात. तरीही घराघरातून मात्र न्याहारीसाठी फोडणीचे खमंग पोहे, सोबत केळीच्या पानात सजलेली रताळी ठेवलेली असतात. तिखट पोहे, गोड पोहे, गूळ पोहे, दूध पोहे, बटाटा पोहे आदी प्रकार यानिमित्ताने होत असतात. प्रथेनुसार काही काही ठिकाणी त्यासोबत काळ्या वाटाण्याची उसळही असते.

कोकणातील एक वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सवापासून सुरू होणारी पारंपरिक भजने दसरा-दिवाळीपर्यंत जोरात सुरू असतात. गावातील भजनी मेळे नवरात्रीतील जागर करतात. भजन मेळ्यांच्या स्पर्धा याच कालावधीत उदंड झालेल्या असतात. भात कापणीचा हंगाम संपत आलेला असतो. पिकलेले भात घरात आलेले असते. याच धावपळीत दिवाळीचे दिवस सरतात आणि तुलसी विवाहाने कोकणातील दिवाळीची समाप्ती होते.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

5 minutes ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

30 minutes ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

1 hour ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

2 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

2 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

3 hours ago