Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसृष्टी बदलतेय; आपण दृष्टी बदलूया!

सृष्टी बदलतेय; आपण दृष्टी बदलूया!

अनघा निकम-मगदूम

आनंदाचा, उत्साहाचा, अंधारावर मात करणाऱ्या प्रकाशाचा सण म्हणजेच दीपावली! सकारात्मक ऊर्जा देतानाच आयुष्य नव्याने जगण्याची उर्मी देणारा सण म्हणजेच दीपावली! नव चांगलं काही करणारा, नात्यांमधील ऋणानुबंध जपणारा, निसर्गाशी नातं जोडणारा सण म्हणजेच दीपावली! जसजशी वर्षं सरत जातात, काळ-वेळ बदलत जाते, तसतसं प्रत्येक गोष्टीचे रूप आणि स्वरूप बदलत जातं तसंच काहीसं आपल्या सण-उत्सवांचंसुद्धा झालंय. या काळानुरूप हे सण आणि उत्सव आपले जुने रूप बदलून नव्या स्वरूपात आता आपल्यासमोर येऊ लागलेत. असं असलं तरीही या सणांचे महत्त्व, या उत्सवाची ऊर्मी, उत्साह, आनंद आजही तसाच आहे. त्याचे महत्त्वसुद्धा तितकंच कायम आहे. दीपावलीसुद्धा अशीच. खूप पूर्वी, अगदी महिनाभर आधी घरामध्ये दीपावलीची लगबग सुरू होत असे. घरात भाजणीचा वास, करंज्या, लाडू चकल्या, शंकरपाळी तयार करण्याची लगबग, नवे कपडे घेण्यासाठी, अभ्यंगस्नानाची तेल उटण्याची तयारी, या सगळ्यासाठी होणारे नियोजन असं सगळं सुरू होई आणि दिवाळी मुहूर्तापूर्वी पंधरा दिवस आधीच घरात येऊन राहत असे. मात्र आताचा जमाना हा ‘इन्स्टंट’ आहे. तयार कपडे, तयार वस्तू, अगदी रांगोळीसुद्धा तयार मिळते आणि फराळ तर ‘घरगुती’ असे लेबल लावून अनेक दुकानांमध्ये विक्रीला येतो. त्यामुळे हल्ली ‘रेडिमेड’कडे कल वाढलाय. गृहिणी कमावत्या झाल्या. त्याच्यामुळेच किचन सांभाळताना आणि घरातले सण उत्सव साजरे करताना या रेडिमेड गोष्टींचा महिलांना फारच उपयोग झाला आहे. जुन्या पिढीने या सगळ्या गोष्टींवर जरी थोडीफार टीका केली असली, पदार्थाला घरची चव नाही हे जरी म्हटलं असलं तरीही आजच्या अत्यंत वेगवान आणि धावपळीच्या काळात हा पर्याय निश्चितच सुखावह आणि उपयुक्त ठरला आहे. आणि नव्या पिढीने त्याचा स्वीकारसुद्धा तितक्याच सहजतेने केलेला आपण पाहिला आहे. एकीकडे नोकरी, दुसरीकडे घरातला ताळमेळ सांभाळताना गृहिणींची होणारी दमछाक यातून वाचलीच. पण त्याचबरोबर हे सण-उत्सव पुन्हा एकदा त्यांच्या मूळ शास्त्राप्रमाणे साजरे केले जाऊ लागलेत हेही तितकेच महत्त्वाचे! या सणांचे महत्त्व नव्या पिढीला तितक्याच उत्साहाने आताच्या कमावत्या गृहिणी उत्साहाने आपल्या मुलांना आवर्जून सांगतात, हेही यातून दिसून आलं.

भारतीय सण आणि उत्सव यांचं मानवी जीवनाशी, नात्यांशी आणि निसर्गाशी अत्यंत जवळचं नातं आहे. हे सण आणि उत्सव निसर्गाशी जोडले असल्यामुळेच आणि या निसर्गातील प्रत्येक गोष्टीला देवत्वाचे रूप दिल्यामुळेच त्याचे स्वरूप हे खूपच विलोभनीय आहे. आजकालच्या या सण उत्सवामध्ये जुन्या परंपरा जपल्या जाण्याचा कल किंवा ‘ट्रेंड’ वाढला आहे. मात्र याला नव्याचा एक ‘टच’सुद्धा मिळालाय. थोडक्यात नव्या आणि जुन्या गोष्टींचं ‘फ्युजन’ झालेलं या सण आणि उत्सवांमध्ये पाहायला मिळतं. एखादी चांगली गोष्ट होत असेल, तर ती शिकावी असं म्हणतात. जसं सगळ्या गोष्टी बदलत असतात, वेळ हा स्थिर नसतो तो बदलत असतो, तसं आपणही बदललं पाहिजे. त्या काळी योग्य वाटणाऱ्या परंपरा, पद्धती या कदाचित पुढच्या पिढीमध्ये चुकीच्या ठरत असतील, तर त्या निश्चितच बदलल्या पाहिजेत. सण-उत्सवांचे मूळ स्वरूप, त्यामागील हेतू हा कायम ठेवला आणि त्यात ते साजरे करण्याची त्याची पद्धत ही काळानुरूप बदलली, तर त्यात निश्चितच वाईट वाटण्यासारखं नाहीये. उलट बदल हाच निश्चित असतो. बदल हा मानवी मनुष्यामध्ये नेहमीच घडत असतो व तो बदल स्वीकारत पुढे गेलं, तरच आपण काळाशी सुसंगत राहतो. सृष्टीसुद्धा बदलत असते. दर ऋतूला नव्याने आपल्यासमोर येतं असते. त्यामुळे आज जे बदलतंय त्याचा स्वीकार करत आपल्या सणांकडे नव्या दृष्टीने, नव्या ऊर्जेने, नव्या उत्साहाने बघितलं, तर ते सण तितक्याच आनंदाने उत्साहाने साजरे केले जातील.

गेली दोन वर्षे या दिवाळी सणावर कोरोनाचं अत्यंत वाईट संकट होतं. आता कोरोना काळ सरलाय. मात्र जग मंदीच्या दिशेने जातंय, असं म्हटलं जातंय. याचाच अर्थ येणारा काळ कदाचित कठीण, अडचणीचा असेल, असे म्हटले जातेय. महागाई अनियंत्रित आहे. आजूबाजूच्या गोष्टींचे दर आवाक्याच्या पलीकडे वाढताना दिसत आहेत. असं असलं तरीही कुठलीच गोष्ट सतत विषम होत नाही. कधीही रात्र कायम राहत नाही. पूर्वेला सूर्य उगवतो आणि नवीन दिवस नेहमीच उगवत असतो. हीच सकारात्मक भूमिका, हेच सकारात्मक विचार जर आपण कायम आपल्या मनात ठेवले, तर येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर सहज मात करता येते. आजच्या अडचणी आपल्याला कदाचित खूप मोठ्या वाटत असतील, तसंच आपल्या आधीच्या पिढीला किंवा त्याही आधीच्या पिढ्यांमध्ये त्यांच्यासमोरसुद्धा हे असेच प्रश्न, अशाच अडचणी निश्चितच उभ्या राहिल्या असतील. ज्याने त्यावर मात केली तो आयुष्यात पुढे गेला आणि जो त्याचा विचार करत राहिला तो तिथेच थांबला. त्यामुळे अडचणी, संघर्ष हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्याचा सामना करत सतत पाऊल पुढे टाकत पुढे जायचं असतं. हाच संदेश या प्रकाशपर्वामध्ये, दिवाळी सण आपल्याला देत असतो. याच दिवाळीमध्ये नरकासुराचा वध होतो, याच दिवाळीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या दिवाळीमध्ये भाऊ बहिणीचं नातं जपणारा भाऊबीजसारखा सण साजरा होतो. म्हणूनच बदल स्वीकारत एकाच वेळेला आयुष्याचे वेगवेगळे अर्थ सांगणाऱ्या दिवाळी सणातून प्रत्येकानेच जगण्याची नवी दृष्टी घेतली पाहिजे आणि जगण्याचा दृष्टिकोनसुद्धा सकारात्मक ठेवला पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -