नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी सह गांधी कुटुंबियांना केंद्र सरकारने जोरदार मोठा धक्का दिला आहे. केंद्र सरकारने राजीव गांधी फाउंडेशनचे एफसीआरए लायसन्स रद्द केले आहे. केंद्राने गांधी कुटुंबाशी संबंधित असलेल्या राजीव गांधी फाऊंडेशन (आरजीएफ) या गैर-सरकारी संस्थेचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (एफसीआरए) परवाना कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी रद्द केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. केंद्राच्या या निर्णयामुळे फाऊंडेशनला आता विदेशातून मिळणारी देणगी बंद होणार आहे.
परदेशातून येणाऱ्या निधीबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याने राजीव गांधी फाउंडेशनवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या संस्थेला चीनकडून मदत मिळत असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२० मध्ये केंद्रीय गृह खात्याने स्थापन केलेल्या एका समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राजीव गांधी फाउंडेशन परदेशातून निधी स्वीकारू शकत नाही.
केंद्रातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘राजीव गांधी फाउंडेशन’चे एफसीआरए लायसन्स केंद्र सरकारकडून रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने केलेल्या या कारवाईवर संस्थेकडून अथवा काँग्रेस नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. ‘राजीव गांधी फाउंडेशन’ च्या अध्यक्षपदी सोनिया गांधी आहेत. तर, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा हे संस्थेचे विश्वस्त आहेत.