Friday, May 9, 2025

कोलाज

जात-पात

प्रियानी पाटील


आपण जात-पात मानत नाही’ याची कबुली देतानाच त्याने हलकेच तिला गुलाबाचे फूल देऊन खूश केलेलं. पण हा जरी जात-पात मानत नसला तरी आपल्या घरात हे सारं मानतात म्हणण्यापेक्षा पाळतात हे तिने त्याला क्षणाचाही विलंब न लावता सांगून टाकलं तेव्हा मात्र तो हादरला. ‘आता काय’ या विचारात दोघंही असताना तो म्हणाला, मी बोलू का तुझ्या घरच्यांशी? कुठच्या जगात वावरतात तुझ्या घरातील माणसं? म्हणावं आज जग फार पुढे गेलंय. किती जुनाट आहे हे सारं?’ तो आधुनिकतेचा वसा घेऊन बोलला. ते तिच्या जिव्हारी लागलंच. ‘घरातील माणसांचा मी समजावून बघते’ तिचं सांगणं ‘केवळ समजावू नकोस. ठासून सांग, मुलगा खूप स्मार्ट आहे. समाजात त्याचं नाव आहे.’ तो म्हणाला तशा तिने भुवया उंचावल्या ‘आणि कमावतो किती? विचारलं तर काय सांगू?’ ‘लाखाचं उत्पन्न आहे बोल.’


‘पण हे मी सांगण्यापेक्षा तूच का नाही येऊन बोलत घरच्यांशी? आंतरजातीय विवाहाला घरातून परवानगी मिळेल असं नाही वाटत.’‘ठीक आहे, मी बोलतो’ म्हणून तो गेलाच तिच्या घरी आणि थेट विषयच काढला म्हणण्यापेक्षा तिला मागणीच घातली. पण जाती-पातीचा विषय काढला तेव्हा आता सारं बोलणं फिस्कटण्याच्या मार्गावर असतानाच तिचे बाबा हसले... म्हणाले, ‘एक जमाना होता, जिथे या साऱ्या गोष्टी पाळल्या जात होत्या. आजही अनेक विवाह हे समाजाला धरूनच केले जातात. पण जिथे मन जुळतात तिथे कशाला आपण मोडतं घाला. माझा आशीर्वाद आहे.’ तिच्या बाबांनी क्षणात त्या दोघांच्या विवाहाला एक प्रकारची संमतीच देऊन टाकली. पण, एक अट घातली, फक्त ‘नारळ आणि मुलगी’ इतकंच मिळेल. कोणत्याही श्रीमंतीचा बडेजाव केला जाणार नाही.


तिच्या बाबांनी केवळ नारळ आणि मुलगी मिळेल अशी अट घातली खरी पण त्या दोघांच्या विवाहाला परवानगी मात्र दिली, जी तिला अनपेक्षितच होती. बाबांच्या बोलण्याचं मोठं आश्चर्य वाटून गेलं. ती त्याला म्हणाली, ‘पाहिलंस ना बाबा किती पुढारलेल्या विचारांचे आहेत ते. मला पण वाटलं नव्हतं, पण बाबांनी अनपेक्षितरीत्या हे सारं मान्य केलं. आता पुढील बोलणी कधी?’ तिने विचारलं. ‘आता माझ्या घरी बोलून सांगतो तुला.’ म्हणून तो निघून गेला. अनेक दिवस मग त्यांच्या गप्पा टप्पा सुरू राहिल्या. पण भेटीचं गणित जमेनासं झालं. तशी ती अस्वस्थ झाली. विवाहाची बोलणी करायला आलेला तो अनेक दिवस बेपत्ता असल्यासारखा वावरतोय हे लक्षात आल्यानंतर मनातून दचकलीच. बाबा काय म्हणतील म्हणून मग ती नजर टाळू लागली. पण बाबांनी विचारलेच ‘जात-पात सोडून मी तुमच्या विवाहाला मान्यता दिली, पण नवरदेव कुठाय? एकदा गेला तो काही पुन्हा आला नाही भेटीला. पुढच्या बोलणीचं काय? म्हणून म्हणतो कोणता माणूस किती विश्वासू आहे, याची पूर्ण खात्री करावी आणि मग पुढे पाऊल टाकावं? काय झालं, गेला कुठे तो?


‘इथून गेल्यापासून तो भेटलेलाच नाहीये. फक्त एक- दोन वेळा फोनवर बोलणं झालं तेवढंच.’ ‘घरातून परवानगी मिळाली नसावी का? पण त्याच्या घरात जात-पात नाही पाळत, मग काय झालं असावं?’ तिने अनेक मार्गांनी त्याला भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं टाळणं म्हणजे तिला मनोमन दुखावण्याचा अट्टहासच. अलीकडे समाजात त्याचे नाव वाढू लागलेले, समाजकार्यात तो रस दाखवू लागलेला. अनेकदा त्याचं नाव अनेक चांगल्या कार्यांतून तिच्या कानावर येऊ लागलं. पण विवाहाला परवानगी देऊनही त्याचं तिला न भेटणं म्हणजे गुढ वाटून गेलं.


नंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला, त्या कार्यक्रमात आपण जावं असं ठरवून अनपेक्षितपणे ती तिथे दाखल झाली. समारंभाच्या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये बसून राहिली. सारे व्यासपीठावर आले तेव्हा हा तिला दिसला. डोक्यावर फेटा, उंची कपडे आणि चेहऱ्यावर निखळ आनंद, वाटलं तडक जावं पुढे आणि त्याला हाक मारावी, पण ती तिथेच थांबली. कार्यक्रमाला सुरुवात झाली. एक एक शब्द तिच्या कानावर येत होते.


हा कार्यक्रम कोणता, सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तर त्याच्या समाजाच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम होता, जिथे त्याला समाजाच्या गटाचं अध्यक्षपद दिलं गेलं. पूर्वीच्या अध्यक्षांनी सत्कार केला. जिथे जात-पात पाळत नाही, असं हा सांगत होता, तिथे हा त्यांच्या समाजाचा अध्यक्ष होऊन बसलाय, हे तिच्या लक्षात आलं.


कार्यक्रम संपल्यानंतर ती त्याला अखेर सामोरी गेली, विचारलं, हे असं अनोळखी आणि बेपत्ता असल्यासारखं किती दिवस वावरणार? मागणी घालून गेलास घरी तो कायमचा बेपत्ता झालास? आणि हे काय जात-पात पाळत नाही, मानत नाही ना, तर मग समाजाच्या अध्यक्षपदाची धुरा कशासाठी घेतलीय?’ तिने जाब विचारला. ‘गप्प बसशील का? हा त्या अध्यक्षांनी मला बहाल केलेला मान आहे. तो मी नाही टाळू शकत. माझ्यावर खूश आहेत ते. तो एवढा श्रीमंत माणूस आहे ना की, सारे फिके पडतील त्यांच्यासमोर. मला त्यांनी आग्रह केला अध्यक्षपदासाठी, सारं द्यायला तयार आहेत ते मला... अगदी त्यांची मुलगी सुद्धा. आज मी केवळ अध्यक्षच नाही, तर त्यांचा होणारा जावई देखील आहे.’ तो गुर्मीने बोलला.


‘अरे पण, बाबांना काय सांगू? ते जात-पात विसरून गेले होते, आता तूच जाती-पातीच्या होऱ्यात आलाहेस?’ तो निर्विकारपणे हसला, म्हणाला ‘तू का आलीस इथे? हा आमच्या समाजाचा कार्यक्रम आहे. विवाह मंडळ नाही फक्त नारळ आणि मुलगी द्यायला.’ त्याचं उपहासात्मक बोलणं तिने जाणलं, ‘फक्त नारळ आणि मुलगी’ ही बाबांनी ठेवलेली अट होती. जी त्याला मान्य झाली नसावी. म्हणूनच त्याने श्रीमंतीला गवसणी घातली. पण जात-पात तर उरलीच ना, ती कुठे संपली होती. यावेळी संपली होती ती केवळ आणि केवळ माणुसकी.

Comments
Add Comment